अभिनेत्री उर्मिला निंबाळकर या कारणामुळे करत नाहीये मालिकेत काम, म्हणाली - 'सासू-सूनांमध्येच...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 01:07 PM2023-07-06T13:07:18+5:302023-07-06T13:08:05+5:30
Urmila Nimbalkar : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्मिला निबांळकर हिने मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मीडियावर स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री उर्मिला निबांळकर (Urmila Nimbalkar) हिने मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मीडियावर स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे. उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि टेलिव्हीजन माध्यमातून काम करत होती. तिने अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच प्रसिद्ध हिंदी मालिकेतूनही काम केले. ज्यामध्ये दिया और बाती हम, दुहेरी, बन-मस्का याचा समावेश आहे. मात्र सध्या ती मालिकेत काम करताना दिसत नाही. याबद्दल नुकताच तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
उर्मिला निंबाळकर म्हणाली की, खूप वर्षे मालिकेतून काम करत होते आणि माझ्याकडे खूप चांगल्या संधीसुद्धा होत्या. पण मालिकांमध्ये काम करताना दररोज १५-१६ तास काम करावं लागतं ज्याचा शरीरावरती खूप परीणाम होतो, अजूनही सगळ्या मालिका सासू-सूनांमध्येच अडकल्यामुळे मला ते पटत नव्हतं. त्याचवेळी ओटीटी प्लॅटफॅार्म आणि यूट्यूबवर खूप चांगल्या प्रतिचा कन्टेट येत होता, अनेक जागतिक दर्जाचे यूट्यूबर्स उदयाला येत होते. त्यामुळे मला असं वाटलं की स्वतःचं असं काहीतरी निर्माण करायला पाहिजे. कलाकार हा नेहमी चांगले चॅनल, प्रोडक्शन हाउस, दिग्दर्शक यांच्यावरच अवलंबून असतो. पण यूट्यूब किंवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्वतःचा कन्टेट आणि प्रेक्षकवर्ग निर्माण करायची संधी मिळते आणि या विचारातूनच मी २०१८ साली गुढीपाडव्याच्या निमित्ताने स्वतःचा यूट्यूब चॅनेल चालू केला.
आणि मी स्वतःचा स्टुडिओ सुद्धा बांधला
ती पुढे म्हणाली की, माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाइलवर मी यूट्यूबसाठी व्हिडीओ करायला सुरवात केली. लाइट आणि माइकसाठीसुद्धा बजेट नव्हतं त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट करायचे म्हणजे आवाज स्पष्ट येईल. आज माझ्या यूट्यूब सबस्क्राबरर्सचा टप्पा साडे नऊ लाखापर्यंत पोहचला आहे, माझी स्वतःची कंपनी आहे, टीम आहे आणि मी स्वतःचा स्टुडिओ सुद्धा बांधला.
बघता बघता हजारो आणि मग लाखो प्रेक्षक झाले
पहिली दोन वर्ष प्रतिसाद कमी होता तरीही उर्मिला वेगवेगळ्या विषयांचे व्हीडीओज बनवत राहीली, अनेक तांत्रिक बाबींचाही अभ्यास केला. फॅशन, मेक-अक, स्किनकेअर यांसारख्या विषयांवर मराठीमध्ये काहीच कन्टेट नव्हता. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला आणि बघता बघता हजारो आणि मग लाखो प्रेक्षक झाले. तिच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मेकअप आणि स्किनकेअर ब्रॅंडने तिच्यासोबत काम केले. इतकेच नाही तर स्टोरीटेल या ओडीओबुक अॅपवर उर्मिलाने स्वतःच्या पॅाडकास्ट शोची निर्मिती केली तसेच अनेक ओडीओ पुस्तकांना आवाजही दिला. तिच्या पेटलेला मोरपीस या ओडीओ कादंबरीसाठी तिला मानांकीत बेस्ट व्हाइस ओफ इंडीया पुरस्कारानेही गौरवण्यात आले.
मराठी युट्यूबर्सना भरपूर संधी आहे
याचे संपूर्ण श्रेय आपल्या मराठी प्रेक्षकांचे आहे. मराठीत उत्तम प्रतिचा कन्टेट दिला तर प्रेक्षक तो उचलून धरतात. फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेतच गोष्टी चालतात हा गैरसमज आहे. मराठी यूट्यूबर्सना भरपूर संधी आहे, या क्षेत्रात भरपूर पैसा आहे. गुगल सुध्दा स्थानिक भाषांना प्रोत्साहन देत आहे आणि लोकांना आपल्या स्वतःच्या भाषेतच कन्टेट बघायला आवडतो. तो कोणीच बनवत नाही त्यामुळे बघितला जात नाही. ही सुध्दा सुरवात आहे अजून बरेच पुढे जायचे आहे, असं उर्मिला सांगते.