'अस्वस्थ वाटतंय...आमचा बापमाणूस हरपला', सासऱ्यांच्या निधनानंतर अभिनेत्री वैशाली भोसले झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:21 PM2021-05-20T13:21:41+5:302021-05-20T13:22:34+5:30
अभिनेत्री वैशाली राहुल भोसले हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनांना मोकळी वाट केली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावल्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. दरम्यान तू माझा सांगाती, चंद्र आहे साक्षीला मालिकेत झळकलेली अभिनेत्री वैशाली राहुल भोसले हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे सासरे पुंडलिक भोसले यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावनांना मोकळी वाट केली आहे.
वैशाली भोसलेने सोशल मीडियावर लिहिले की, आज सकाळीच दोन बातम्या कानावर आल्या. कोव्हिड १९ मध्ये प्लाझ्मा थेरेपी बंद होणार.. कारण ती उपयोगी नाही.. त्यावर आणखी एक..रेमडेसीवीर ही बंद होण्याची शक्यता. इतकं अस्वस्थ वाटतंय.. मोठ्याने किंचाळावंस वाटतंय.. रडावंस वाटतंय..१५ दिवसांपूर्वी आम्ही याच प्लाझ्मा आणि रेमडेसीवीरसाठी हतबल झालो होतो.. अव्वाच्यासव्वा किमतीला ते विकतही घेतले.. समोर फक्त एकच लक्ष होते.. पप्पांना बरे करायचे.. त्यांना वाचवायचे..
ती पुढे म्हणाली की, राहुलचा फेब्रुवारीत पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाली. सुदैवाने मला काही लक्षण नव्हती. हसत रडत १७ दिवस उपचार आणि सगळ्या नियमांचे पालन करून आम्ही यातून बाहेर पडलो. त्यानंतर राहुलची अॅण्टीबॉडीजची सकाळीच टेस्ट झाली आणि रात्री गावाहून फोन आला. माझ्या सासऱ्यांना (पप्पाना) अॅडमिट केलं. राहुल रिकव्हर झाल्यावर तिथे गावी पप्पांना ताप येत होता इतक्या वर्षांमध्ये पप्पांना बरं नाही असं कधी झालं नव्हतं. योगा, मॉर्निंग वॉक, प्राणायाम असं सगळं ते अनेक वर्ष करत होते..एक दोन दिवसांत ताप उतरला नाही. तेव्हा राहुल ने त्यांना कोव्हिड टेस्ट करून घ्यायचा सल्ला दिला. पण त्यांनी स्पष्ट नकार दिला. (याआधी बऱ्याच वेळा पप्पांनी सांगितलं होतं.. कोरोना पॉझिटिव्ह आले की गावात वाळीत टाकतात.) त्या भीतीने कदाचित ते प्रत्येक वेळी हेच सांगत होते.. "मला आता बरं वाटतंय.." ७ एप्रिलला... त्यांना टेस्ट करावी लागली.. सकाळपासून त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला.. रात्री टेस्ट पॉझिटिव्ह आली..वय वर्षे ६४ अॅडमिट केलं.. यावेळी मात्र आम्ही दोघेही खूप घाबरलो होतो. दुसऱ्या दिवशी राहुल धावत पळत सुहास ला घेऊन गावी पोहोचला. राहुलला पाहुन त्यांना धीर आला.आणि मग सुरु झाला प्रवास.. ऑक्सिजन.. सीटिस्कोर.. सीटिस्कॅन.. शुगर.. बी. पी... व्हेंटिलेटर.. दुसरं हॉस्पिटल.. प्लाझ्मा.. रेमडेसीवीरचा काळा बाजार..होतील ते सगळे प्रयत्न केले त्यांना वाचवायचे...अपयशी ठरल्याचं तिने सांगितले.
वैशालीच्या सासऱ्यांनी ११ एप्रिलला अखेरचा श्वास घेतला. ती म्हणाली की, परफेक्ट माणुस.. वयाच्या ८व्या वर्षापासून परिस्थितीशी झगडणारा, वक्तशीर, टापटिप, हिशेबी, सदैव आनंदी, सकारात्मक वृत्ती, वयाच्या ५६-५७ व्या वर्षी गाडी शिकून एकटे मुंबई - सातारा प्रवास करणारे, स्वावलंबी, कमालीचे निष्ठावान, ९वर्ष त्यांनी आपल्या पॅरालाइज्ड बायकोला.. वाचवलं.. जगवलं. अहोरात्र सेवा केली.. कधीच खचले नाही ते. स्वतःच्या बाबतीत मात्र खचले. ११ तारखेला त्यांनी अखेरचा श्वास घेतला..आमचा बापमाणुस गेला.
सासऱ्यांच्या निधनाने कोलमडून गेलेले असताना त्यांना गावातील वाईट अनुभव आला. पप्पा म्हणत होते तसे अनुभव यायला लागले.. सगळ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह येऊन ही.. गावाने खरंच आम्हाला वाळीत टाकले. ज्यावेळी आधाराची गरज असते तेव्हा प्रत्यक्षरित्या खरंच कुणी नव्हतं.. या काळात सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहेच.. पण भावनिक अंतर वाढले तर माणुसकी वरचा विश्वास उडतो..जसं जमेल तसं कार्य उरकलं आणि क्वारंटाइन झाल्याचे वैशालीने म्हटले.
तिने पुढे लिहिले की,या सगळयात पहिल्या दिवसापासून अश्विनी, निलेश, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान, अमर कुंभार, सुहास, अविनाश, राहुल चे जवळचे फ्रेंड्स, आमची फॅमिली सगळ्यांनीच मोलाची मदत केली. नाना सीरियस असतानाही आशु, नीलेश होईल ती मदत करत होते.. अमर कुंभार.. कोण कुठले.. आशु,नीलेशच्या सांगण्यावर काही मिनिटात राहुलच्या आधी पप्पांजवळ पोहोचले होते आणि त्यांची जमेल ती काळजी घेत होते. एकीकडे माणुसकीचं उदात्त दर्शन...तर दुसरीकडे प्लाझ्मा रेमडेसीवीरचा काळा बाजार करणारे..माणुसकीला काळीमा फासणारे..
तसेच तिने इतरांना आवाहन केले आहे की, या कठीण काळात एकमेकांना आधार देऊयात..योगासने, प्राणायाम, मेडिटेशन ही त्रिसूत्री पाळूया. कोणताही आजार अंगावर न काढता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊया. घरी राहुया स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवूया..दुर्लक्ष करू नका.. वेळीच उपाय केला की सुखरूप बाहेर पडता येतं..आठवणींपेक्षा माणसं जास्त महत्त्वाची असतात.
वैशाली भोसलेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने मालिका व नाटक या माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे. वैशालीची मराठी सिनेइंडस्ट्रीतील करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून झाली. ई टीव्हीवरील ब्रह्मांडनायक या गजानन महाराजांवर आधारित मालिकेत तिने काम केले आहे. याशिवाय तिने बऱ्याच मालिकेत काम केले आहे. स्टार प्रवाहवरील लक्ष्य, बंध रेशमाचे मालिकेत कैरेक्टर रोल केले. झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टारमध्ये ती झळकली होती. तसेच कलर्स मराठी वरील तू माझा सांगाती मालिकेत तिने भानुबाई आणि द्वारकाची भूमिका केली. शेवटची ती चंद्र आहे साक्षीला या मालिकेत मिताली आचरेकरच्या भूमिकेत पहायला मिळाली. याशिवाय मिलिंद शिंदे लिखित दिग्दर्शित नाच तुझंच लगिन हाय या सिनेमात काम केले. तसेच आगामी रमेश मोरे लिखित आणि दिग्दर्शित टॉपर या सिनेमातही ती झळकणार आहे.