एकेकाळी गाणं सोडून देण्याच्या विचारात होता आदर्श शिंदे, मात्र आज आहे आघाडीचा गायक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:11 PM2018-12-26T18:11:44+5:302018-12-26T18:17:56+5:30
संगीताचा वारसा लाभलेले दोन लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे मंचावर आले. मंचावर बऱ्याच गप्पा रंगल्या तसेच गाणी देखील सादर झाली.
कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यात येणार आहेत महाराष्ट्राचे लाडके गायक. संगीताचा वारसा लाभलेले दोन लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे मंचावर आले. मंचावर बऱ्याच गप्पा रंगल्या तसेच गाणी देखील सादर झाली. राहुल देशपांडे यांनी लहानपणीच्या आठवणी तसेच पु ल देशपांडे यांच्या आठवणी देखील सांगितल्या. राहुल आणि आदर्श यांनी मंचावर बरीच धम्माल मस्ती केली.
राहुल देशपांडे यांना मकरंद अनासपुरे यांनी आनंद आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली का ? विचारल्यास ते म्हणाले नक्कीच.. आनंद शिंदे यांची बरीच गाणी ऐकली आहेत. गणपतीच्या वेळेला मिरवणुकीला जायचो तेव्हा तिथे यांची गाणी असायची तेव्हा ऐकली आहेत. आदर्श शिंदने बाप्पा मोरया रे ! या गाण्याच्या दोन ओळी म्हणून दाखविल्या. आदर्श आणि राहुल एकत्र असल्यावर गाणी सादर होणार नाही असे शक्यच नाही. राहुलने देखील बगळ्यांची माळ फुले हे गाण सादर केले.
चक्रव्यूह राउंड मध्ये आदर्शला सुरेश वाडकर यांच्याविषयी एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली असता तो म्हणाला, आवडती गोष्ट म्हणजे “आवाज”... जेव्हा मी त्यांच्याकडे जायचो तेव्हा मला नेहमी वाटायचं असं गाण मला आयुष्यात कधीच जमणार नाही. गाण सोडून दिलेलंच बर.यानंतर आदर्शने सुरेश वाडकर यांचे ए जिंदगी हे गाणं गाऊन दाखवलं. याच राउंड मध्ये राहुलला प्रशांत दामले यांच्याबाबत आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली तेव्हा तो म्हणाला आवडती गोष्ट म्हणजे “सळसळत चैतन्य”. तसेच या दोघांना दोन संवाद दिले जे त्यांना गाण्याच्या चालीत म्हणायचे होते. राहुल देशपांडे यांनी पु.ल.देशपांडे यांची एक सुंदर आठवण प्रेक्षकांना सांगितली आहे.