आध्विक महाजनला अभिनयाव्यतिरिक्त 'ही' गोष्ट आवडेल करायला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 07:15 AM2019-03-12T07:15:00+5:302019-03-12T07:15:00+5:30
दिव्य दृष्टी मालिकेत आध्विक महाजन मुख्य भूमिका साकारत आहे.
आजकालचे अभिनेते स्वत:ला केवळ दैनंदिन टीव्ही मालिकांतील अभिनयापुरतेच मर्यादित ठेवत नाहीत; तर ते कधी कधी एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही करतात. प्रेक्षकांची अतिशय आवडती अभिनेत्री असलेली दिव्यांका त्रिपाठी हीसुद्धा अशाच कलाकारांपैकी एक असून ती सुद्धा सध्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत आहे. आता स्टार प्लसवरील दिव्य दृष्टी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता आध्विक महाजन यानेही मनोरंजनाच्या क्षेत्रातील विविध भूमिका स्वीकारण्याचा दृष्टिकोन अंगिकारला असून आपल्याला एके दिवशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यास आवडेल, असे त्याने म्हटले होते.
आध्विक महाजन म्हणाला, “मलाही कधी तर एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायला आवडेल; कारण त्या भूमिकेत मला माझी स्वत:ची ओळख पटेल आणि माझी स्वतंत्र छाप पाडता येईल. प्रेक्षकांनाही खरा आध्विक महाजन कसा आहे, ते दिसून येईल. अभिनयापेक्षा सूत्रसंचालनाचे काम अगदी वेगळे असून मला ते करून पाहण्याची इच्छा आहे.”
आध्विक महाजनने आजवर विविध मालिकांमधील भूमिकांद्वारे लक्षावधी चाहते मिळविले असून सध्या तो ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ मालिकेत रक्षित शेरगिल या नायकाची भूमिका रंगवीत आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. या दोन बहिणींच्या जीवनात रक्षित शेरगिल अतिशय महतत्वाची भूमिका
पार पाडणार आहे.
नजीकच्या भविष्यकाळात या तरूण पंजाबी अभिनेत्याला एखाद्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे.