‘दिव्य दृष्टी’च्या सेटवर आध्विक महाजनला मिळाले हे सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 08:30 PM2019-04-15T20:30:00+5:302019-04-15T20:30:02+5:30
दिव्य दृष्टी मालिकेचा नायक रक्षित शेरगिलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आध्विक महाजनचा तर सध्या घरापेक्षाही जास्त वेळ हा मालिकेच्या सेटवर जातो.
कथानकातील अनपेक्षित वळणे आणि कलाटण्यांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेत पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. या मालिकेची टीम सध्या कित्येक तास या मालिकेसाठी चित्रीकरण करत आहे. या मालिकेतील कलाकारांना दररोज या मालिकेची पुढील कथा समजून घ्यावी लागते, त्यानंतर त्यांना आपल्या भूमिकेचे स्थान काय आहे आणि संवाद कोणते आहेत, ते लक्षात घ्यावे लागतात, त्यानंतर या संवादांची तालीम करावी लागते आणि नंतर त्याचे चित्रीकरण करावे लागते. या साऱ्या गोष्टींमध्ये कलाकारांचा खूप वेळ खर्च होतो आणि त्यासाठी त्यांना संयमही राखावा लागतो.
दिव्य दृष्टी मालिकेचा नायक रक्षित शेरगिलची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आध्विक महाजनचा तर सध्या घरापेक्षाही जास्त वेळ हा मालिकेच्या सेटवर जातो. त्यामुळे त्याची पत्नी नेहा महाजनने या मालिकेच्या सेटवर अनपेक्षितपणे येऊन आध्विकला सरप्राईज दिले. तिला तिथे आलेली पाहून आध्विकला खूपच आनंद झाला. आध्विक महाजन दररोज सुमारे 12 तास मालिकेचे चित्रीकरण करतो. तसेच तो कधीच सुटी घेत नाही. त्याच्या या अतिशय व्यग्र वेळापत्रकामुळे त्याला त्याची पत्नी आणि कुटुंबीय यांना फारसा वेळ देता येत नाही. म्हणूनच त्याची पत्नी नेहाने स्वत:च सेटवर येऊन त्याची भेट घेण्याचा तोडगा काढला. येताना तिने त्याच्या आवडीचे जेवणही बरोबर आणले होते आणि ते त्याच्यासह अन्य कलाकारांनाही तिने खाऊ घातले. यामुळे आनंदित झालेल्या आध्विकने सांगितले, “आज नेहा सेटवर आल्यामुळे माझा दिवस खूपच छान गेला. तिला सेटवर पाहिल्यावर मला झालेला आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.”
आध्विकचे जीवन हे टीव्हीवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या बहुतांशी कलाकारांचे प्रातिनिधिक जीवनच आहे आणि टीव्हीवर दिसत असलेल्या ग्लॅमरच्या झगमगत्या दुनियमागे किती कठोर मेहनत आणि कष्ट असतात, त्याची झलकच आपल्याला यातून पाहायला मिळतेय. प्रेक्षकांना प्रत्येक भागात काहीतरी चांगले पाहायला मिळावे, यासाठी मालिकांतील कलाकार आणि कर्मचारी खूप कष्ट घेत असतात.