आलिया भट आणि वरूण धवन यांनी ‘द व्हॉइस’ मध्ये सांगितले आपल्या आवडत्या गायकाविषयी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 06:00 PM2019-04-14T18:00:00+5:302019-04-14T18:00:02+5:30
अलीकडेच ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आलिया भट आणि वरूण धवन या आजच्या पिढीच्या लाडक्या कलाकारांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांची मने जिंकली.
कलंक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या या चित्रपटाची टीम करत आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले आलिया भट्ट, वरुण धवन आणि सोनाक्षी सिन्हा यांनी नुकतीच ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाच्या सेटला भेट दिली. या कार्यक्रमाचे अंतिम 10 स्पर्धक आपल्या अप्रतिम गायनकलेने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याने या कार्यक्रमाचा प्रत्येक भाग दिवसेंदिवस आकर्षक आणि उत्कंठावर्धक होत चालला आहे.
अलीकडेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आलिया भट आणि वरूण धवन या आजच्या पिढीच्या लाडक्या कलाकारांनी आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमातील परीक्षक आणि नामवंत गायक अदनान सामीला जेव्हा कळले की, हे दोघेही आपले फार मोठे चाहते आहेत, तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले.
अदनान सामीचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज प्रत्येकाच्या मनावर कोरला गेला आहे. आपण अदनान सामीचा आवाज आणि त्याच्या गुणांचे प्रचंड मोठे चाहते आहोत, ही गोष्ट अमाल मलिक, कनिका कपूर आणि हर्षदीप कौर या अन्य परीक्षकांनी आतापर्यंत अनेकदा सांगितली आहे. आता वरूण धवन आणि आलिया भट या बॉलिवूडच्या लाडक्या कलाकारांनीही या कार्यक्रमात आपण अदनानच्या आवाजाचे फॅन्स आहोत, हे वारंवार सांगितले. इतकेच नव्हे, तर या कलाकारांनी त्याला विनंती केल्यावर त्याने आपले ‘भीगी भीगी रातों में’ हे प्रसिद्ध गाणे गायले, तेव्हा वरूण आणि आलियाने त्यावर नृत्य केले. यानंतर वरूणने अदनानला आपल्या ‘कलंक’ या आगामी चित्रपटातील ‘फर्स्ट क्लास’ हे गाणे गाण्याची विनंती केली. अदनानने तीही विनंती तात्काळ मान्य केली आणि या गाण्याच्या त्याच्या सादरीकरणाने तो भारावून गेला.
सामान्यांप्रमाणेच अदनान सामीच्या गायनाचे चाहते बॉलिवूडचे कलाकारही आहेत. ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातही परीक्षक आणि मार्गदर्शक म्हणून त्याने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याच्या व्यक्तिमत्त्वाने आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे स्पर्धकांना आपल्यात बदल घडवून आणण्यास मोठी मदत होत आहे.