‘आई’च्या भूमिकेचा फायदा अन् तोटाही - रिमा लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 07:18 AM2016-09-23T07:18:57+5:302016-10-24T12:52:37+5:30
EXCLUSIVE गेल्या काही दशकांपासून चित्रपटात ‘आई’ची भूमिका साकारणाºया अभिनेत्री रिमा लागू यांनी मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावर देखील स्वत:ची छाप ...
गेल्या काही दशकांपासून चित्रपटात ‘आई’ची भूमिका साकारणाºया अभिनेत्री रिमा लागू यांनी मोठ्या पडद्यासह छोट्या पडद्यावर देखील स्वत:ची छाप पाडली आहे. दमदार अभिनय अन् तितक्याच गहिवरल्या आवाजाची देणगी मिळालेल्या रिमा यांनी आतापर्यंत चित्रपटातील आईचे पात्र चांगलेच गाजवले आहे. आता त्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मात्र त्याच भूमिकेत ‘नामकरण’ या मालिकेतून परतत आहेत, यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद...
प्रश्न : इतक्या वर्षानंतर छोट्या पडद्यावर परतण्याचा विचार कसा केला?
- मला छोट्या पडद्याचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. केवळ चांगल्या कथेच्या मी शोधात होते. निर्माता, दिग्दर्शक महेश भट्ट यांनी ‘नामकरण’ या मालिकेच्या रुपाने चांगल्या कथेचा प्रस्ताव ठेवला अन् माझा शोध संपला. वास्तविक या मालिकेची कथा समाजाशी सलंग्नित असल्याने त्यामध्ये काम करण्याचा अनुभव खुपच रोमांचक राहिला आहे. मालिकेतील माझी भूमिका निगेटिव्ह स्वरूपाची जरी वाटत असली तरी, परिस्थितीनुरूप त्यासर्व गोष्टी घडत जात असल्याचे कालांतराने लक्षात येते. मालिकेची कथा अशा मुलीच्या जीवनावर आधारित आहे, जी धाडसी, मोकळ्या विचाराची आणि निडर स्वभावाची आहे. या मुलीच्या नजरेतून एका सामान्य परिवारातील उणिवा दाखविण्याचा प्रयत्न या मालिकेतून करण्यात आला आहे. मालिकेत आठ गाण्यांचा समावेश असून, अणू मलिक, अनुराधा पौडवाल, कुमार सानू यांच्यासह मोणाली ठाकुर, अरजीत सिंह यासारख्या नव्या दमाच्या गायिकांनी ते गायले आहेत.
प्रश्न : चित्रपट, मालिका आणि डेली सोप या तीन्ही प्रकारातील तुमचा अनुभव कसा सांगाल?
- तिन्ही फॉरमॅटमध्ये काम करण्याचा अनुभव हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. चित्रपटात एखादा सीन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जातो. मालिकेमध्ये याच्या विपरीत परिस्थिती असते. ठराविक वेळेतच तो सीन पुर्ण करावा लागतो. तेच डेलि सोपमध्ये काम करण्यासाठी भरपुर एनर्जीची गरज असते. या तीन्ही फॉरमॅटमध्ये काम करण्यासाठी ‘मानसिक ट्रेनिंग’ची आवश्यकता असते. त्यासाठी मन शांत ठेवणे ही एकमेव टीप्स देता येईल. खरं तर सध्या काळ बदलल्याने कुठल्याही फॉरमॅटसाठी अत्याधुनिक टेक्नीकचा वापर केला जात असल्याने त्याच्याशी जुळवून घेणे हेच सगळ्यात मोठे आव्हान होते. एका-एका युनिटमध्ये १८० ते २०० लोक एका वेळेला काम करीत असतात. प्रत्येक जण ज्याची-त्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असतात. याच्याशी जुळवून घेणे व नव्या प्रणालीची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे असते. मला आता याची आवड निर्माण झाली आहे.
प्रश्न : बदललेल्या मराठी चित्रपटांविषयी तुमचे मत काय?
- नक्कीच हा बद्दल प्रशंसनीय आहे. गेल्या काळात ज्या पद्धतीचे चित्रपट येवून गेले, ते खरच सुरेख होते. ‘किल्ला, येलो, सैराट, फॅड्री, ७२ मैल एक प्रवास’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘किल्ला’ या चित्रपटाचा मला विशेष उल्लेख करावसा वाटेल. अगदी छोटा मुद्या ज्या पद्धतीने पडद्यावर मांडण्यात आला त्यावरून त्या तरुण दिग्दर्शकाचे जेवढे कौतुक केले तेवढे कमीच आहे. सध्या मराठी चित्रपट एका चांगल्या वळणावर आहे. शिवाय अत्याधुनिक टेक्नीकचा येथेही वापर केला जात असल्याने हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.
प्रश्न : महेश भट्ट यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा सांगाल?
- महेश भट्ट हे माझे आॅलाटाइम फेव्हरेट दिग्दर्शक राहिले आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव नेहमीच दर्जेदार असा आहे. एक व्यक्ती म्हणून सांगायचे झाल्यास ते अतिशय हेल्पफुल आहेत. कुठल्याही भूमिकेबाबत असलेली अडचण त्यांच्याशी शेअर केल्यास त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो. जेव्हा महेश भट्ट यांनी मला ‘नामकरण’ या मालिकेची कथा ऐकविली, तेव्हा मला असे वाटले की, टेलिव्हिजनच्या इतिहासात काही तरी नवे घडत आहे. त्याचा मी भाग बनल्याचा मला आनंद होतो.
प्रश्न : ‘आई’ची भूमिका साकारण्याचा तुम्हाला फायदा झाला की तोटा?
- ‘मैने साजन, मैने प्यार किया, हम साथ-साथ है, पत्थर के फुल, जुडवा, वास्तव’ आदी चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारल्यानंतर फायदे तोट्याचा फारसा विचार करण्यात अर्थ नाही. खरं सांगायचे झाल्यास या भूमिकेचा जेवढा फायदा झाला तेवढाच तोटाही झाला. फायदा म्हणजे मला धर्मेंद्र यांच्यासह सलमान, संजय दत्त यासारख्या कलाकारांसोबत काम करता आले. तोटा म्हणजे मला त्यावेळी आवडत असलेल्या भूमिका साकरता आल्या नाहीत. त्यामुळे मी माझ्या करीअरबाबत कितपत समाधानी आहे हे सांगणे मुश्किल आहे. बहुधा कुठलाच कलाकार त्याच्या करीअरबाबत समाधानी नसतो, हेही तेवढेच खरे आहे.
satish.dongare@lokmat.com