अग्निहोत्रनंतर आणखीन एक मालिका घेणार निरोप, असा होणार शेवट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:39 PM2020-03-12T15:39:40+5:302020-03-12T15:44:12+5:30
विठुमाऊली मालिकेचा अखेरचा भागही हाच संत परंपरेच्या संदेश देत पूर्णत्वास जाणार आहे.
जवळपास 2 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर 'विठुमाऊली' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची सांगताही भक्तीपूर्ण वातावरणात होणार आहे. भक्त परंपरेची मुहूर्तमेढ रोवत आणि युगानुयुगे भक्तांचा माऊली प्रमाणे सांभाळ करण्याचं वचन देत विठुमाऊली शरीररूपाने अंतर्धान पावली. मात्र युगानयुगे विटेवरी उभी राहून ती भक्तांचा सांभाळ करते आहे. संत पुंडलिक, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा यांनी संत परंपरा अखंड चालू ठेवली आणि आजतागायत कोणताही खंड न ही परंपरा सुरू आहे. विठुमाऊली मालिकेचा अखेरचा भागही हाच संत परंपरेच्या संदेश देत पूर्णत्वास जाणार आहे. २२ मार्चला रात्री ८ वाजता महाएपिसोडने या मालिकेची सांगता होईल.
नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं. याप्रसंगी सर्वच कलाकार भावूक झाले होते. विठुरायाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतने या प्रसंगी सर्व रसिकांचे मनापासून आभार मानले. ‘जगाला प्रेम देणारी माऊली स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सने माझ्यात पाहिली यासाठी मी कायम ऋणी राहिन. मौल्यवान शिंपल्यातल्या मोत्याप्रमाणे ही भूमिका माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहिल. पैश्याने सर्व गोष्टी विकत घेता येतीलही पण प्रेम कधीच विकत घेता येत नाही. या भूमिकेने मला रसिकांचं भरभरुन प्रेम दिलं जी आयुष्यभराची शिदोरी आहे. अशी भावना अजिंक्य राऊतने व्यक्त केली.’