गौतम बुद्ध व कृष्णाच्या भूमिकेनंतर आता हा अभिनेता साकारतोय रामाची भूमिका
By तेजल गावडे | Published: August 21, 2019 05:14 PM2019-08-21T17:14:04+5:302019-08-21T17:14:55+5:30
छोट्या पडद्यावरील या अभिनेत्यानं गौतम बुद्ध व कृष्णाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे.
छोट्या पडद्यावरील अभिनेता हिमांशु सोनीने गौतम बुद्ध व कृष्णाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपली छाप उमटविली आहे. त्यानंतर आता तो कलर्स वाहिनीवरील 'राम सिया के लव कुश' मालिकेत रामाची भूमिका साकारतो आहे. या मालिकेच्या निमित्ताने केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
'राम सिया के लव कुश' मालिकेबद्दल काय सांगशील?
मी बालपणापासून पौराणिक कथा ऐकत मोठा झालो आहे. रामाची भूमिका साकारणं माझ्यासाठी एक चांगला अनुभव आहे. रामायणाची कथा आपण ऐकलेली आहे. मात्र या मालिकेत लव कुशच्या दृष्टीकोनातून रामायण दाखवण्यात आलं आहे
१९८७ साली प्रसारीत झालेल्या रामायणात अरूण गोहील यांनी रामाची भूमिका साकारली होती. तर तुझी तुलना त्यांच्याशी होईल असं वाटतं का?
अजिबात नाही. 'राम सिया के लव कुश' मालिका जास्त करून हल्लीचे तरूण पाहणार आहेत. त्यांनी पूर्वीचं रामायण पाहिलेलं नाही. त्यावेळी तंत्रज्ञान तेवढं विकसित नव्हतं. तसंच पेहरावही वेगळा होता. त्यामुळे आता पूर्वीच्या रामायणातील गोष्टी पटणार नाहीत. या मालिकेत बऱ्याच वेगळ्या गोष्टी पहायला मिळणार आहेत.
पौराणिक भूमिकांमुळे तुझ्यामध्ये काय बदल झाला आहे?
कलाकार म्हणून भूमिका साकारण्याआधी त्या भूमिकेचा अभ्यास केला जातो. त्या पात्रातील चांगल्या गोष्टी तुम्ही आत्मसात करता. जितक्या चांगल्या गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात आत्मसात करू शकता. प्रभू रामाची भूमिका साकारून माझ्यातील प्रगल्भता वाढली.
एकाच प्रकारच्या भूमिका साकारून साचेबद्ध भूमिकांमध्ये अडकून पडशील का, अशी तुला भीती वाटते का?
अजिबात नाही. सध्या छोट्या पडद्यावर ज्या मालिका प्रसारीत होत आहेत त्यात पुरुषांपेक्षा महिलांचे पात्र जास्त सशक्त असतं. कारण सध्या स्त्रीकेंद्रित मालिका बनत आहेत. त्यामुळे नेहमीच्या मालिकांपेक्षा अशा पौराणिक मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यात मला जास्त रस आहे. एक पुरूष अभिनेता असल्यामुळे मला पौराणिक कथेत चांगली भूमिका मिळते आहे. मला वाटत नाही की मी एखाद्या साच्यात अडकून जाईन. कारण प्रत्येक ऐतिहासिक किंवा पौराणिक भूमिका वेगळी असते.
तुला पौराणिकशिवाय कोणत्या मालिकेत काम करायला आवडेल?
मला पुरूषप्रधान मालिकेत काम करायचं आहे. कारण तुम्ही महिला केंद्रीत मालिकेत निगेटिव्ह भूमिका करता तेव्हा त्या भूमिकेची काही महिन्यातच मालिकेतून एक्झिट होते.
तुझ्या करियरमध्ये पत्नीचा किती पाठींबा असतो?
तिचा खूप पाठींबा आहे. ती माझे काम पाहून मला सल्ला देते. ती नेहमी माझ्या कमतरतेबद्दल सांगते. कधीच चांगल्या गोष्टी सांगत नाही. या मागचं कारण ती सांगते की, ज्या दिवशी मी तुझी प्रशंसा करायला सुरूवात करेन तेव्हा तुला वाटेल की तू चांगला अभिनेता आहे. जर मी टीका करेन तर तू आणखीन चांगलं काम करशील.
बॉलिवूडमध्ये काम करण्याचा विचार आहे का?
हो. मला चित्रपटांच्या ऑफर्स येतात. पण, मला चांगल्या बॅनरच्या चित्रपटात काम करायचं आहे. जे काम चांगलं वाटतं तेच काम मी करतो.