'विक्रम बेताल' मालिकेत अहम शर्मा साकारणार राजा विक्रमादित्यची भूमिका !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:02 PM2018-08-31T12:02:56+5:302018-08-31T12:04:29+5:30
विक्रम आणि वेताळच्या कथा `बेताल पच्चिसी’ नावाने लोकप्रिय आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी या गोष्टी ऐकलेल्या असतील. वेताळचा भयानक अवतार ...
विक्रम आणि वेताळच्या कथा `बेताल पच्चिसी’ नावाने लोकप्रिय आहेत. आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी या गोष्टी ऐकलेल्या असतील. वेताळचा भयानक अवतार आपल्या मनात घर करून राहिला आहे, तसेच उज्जैनचा शूर राजा विक्रमादित्य त्याच्या शौर्य आणि प्रामाणिकपणासाठी आपल्याला माहिती आहे. छोट्या पडद्यावर 'विक्रम बेताल की रहस्य गाथा' या मालिकेतून ही पात्रे पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार आहेत. लोकप्रिय अभिनेता अहम शर्मा यातील शूर राजा विक्रमादित्यची भूमिका साकारणार आहे, तसेच या मालिकेत काही समकालीन बदलही करण्यात येत आहेत.
सी एल सैनी पेनिनसुला पिक्चर्सतर्फे निर्मिती करण्यात आलेल्या या मालिकेचे निर्माते आणि लेखक आहेत. या मालिकेतून राजा विक्रमादित्यची हुशारी, शौर्य आणि सदाचरणी वृत्ती याबरोबरच त्याच्या स्वभावातील अहंकाराचा कांगोराही दाखवला जाईल. या मालिकेत दुष्ट भद्रकाल त्याला मुक्त आत्मा वेताळला पकडून आणायचे आव्हान देईल. हा वेताळ राजाला प्रत्येक परिस्थितीतील योग्य आणि अयोग्य यामधील अवघड निवड करायला सांगेल. या मालिकेत विक्रम राजा वेताळकडून समोर ठेवण्यात आलेल्या परिस्थितीतून आधुनिक आणि प्रॅक्टिकल निवड करेल.
मुळात अहम इंजिनिअर असून अभिनय क्षेत्रात नाव कमावत आहे. त्याने आजवर केलेल्या विविध कामातून आपले कौशल्य दाखवले आहे, तसेच त्याने अनेक प्रसिद्ध बीटाउन कलाकारांबरोबर काम केले आहे आणि अनेक टीव्ही शोमध्येही तो झळकला आहे. यापूर्वी त्याने महाभारत मालिकेत साकारलेल्या कर्णाच्या भूमिकेमुळे त्याला अमाप प्रसिद्धी लाभली. या मालिकेत अहमसोबत मकरंद देशपांडे वेताळची भूमिका साकारतील, या संस्मरणीय गोष्टीतून ही जोडी अनेक नव्या गोष्टी रसिकांना पाहायला मिळतील.
या विषयी अहम सांगतो, ``विक्रम आणि वेताळच्या गोष्टी माझ्या लहानपणाचा अविभाज्य भाग आहेत आणि मला राजा विक्रमादित्यच्या शौर्याने भारून टाकलेलं. &TV वरील विक्रम बेताल की रहस्य गाथा या मालिकेमुळे जुन्याच कथा समकालीन प्रेक्षक आणि परिस्थितीनुरूप जोडल्या जाऊ शकतात, तसेच त्या तितक्याच भव्यतेने मांडता येऊ शकतात हे मला कळले आहे आणि माझी उत्सुकता वाढली आहे. प्रेक्षकांना विक्रमादित्य पात्राबद्दल, त्याच्याबद्दलच्या नवीन गोष्टींबद्दल अधिक जाणून घेता येणार आहे, शिवाय प्रत्येक कार्यक्रमानंतरचा संदेश प्रेक्षकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे. आजच्या तरुण भारतीय प्रेक्षकांपुढे ही कथा त्याच विश्वासाने मांडणे ही तशी मोठी जबाबदारी आहे आणि ती सक्षमपणे मी करू शकेन असे मला वाटते.’’