'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 16:26 IST2024-05-09T16:26:16+5:302024-05-09T16:26:52+5:30
Mugdha karnik: स्वभावातील कणखरपणा आणि तितकीच मायेची उब यामुळे आहिल्यादेवी ही भूमिका लोकप्रिय झाली.

'मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण ..'; आईची भूमिका साकारण्याविषयी आहिल्यादेवीची प्रतिक्रिया
झी मराठीवर सध्या 'पारु' ही मालिका बरीच लोकप्रिय ठरत आहे. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. यात या मालिकेत अशा काही भूमिका आहेत ज्या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. त्यातलीच एक भूमिका म्हणजे आहिल्यादेवी किर्लोस्कर. स्वभावातील कणखरपणा आणि तितकीच मायेची उब यामुळे ही भूमिका लोकप्रिय झाली. अभिनेत्री मुग्धा कर्णिकने ही भूमिका साकारली असून तिला आईपणाचा अनुभव नसूनही तिने ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. या भूमिकेविषयी अलिकडेच तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण जे आपण खऱ्या आयुष्यात नाही आहोत ते स्क्रीनवर साकारण्याचं आव्हान मला खूप आवडतं. भूमिका जर अप्रतिम असेल तर लहान मुलांची आई असो किंवा मोठ्या मुलांची आई त्याने जास्त काही फरक पडत नाही. मी भूमिकेच्या प्रेमात पडून त्यात जे घडवायचे आहे, ते स्क्रीनवर आपण किती चांगल्या प्रकारे सादर करु शकतो यावर मेहनत घेते. म्हणून मी कोणत्या वयाच्या मुलांच्या आईची भूमिका साकारतीये याचा मला फरक पडत नाही", असं मुग्धा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "माझ्या आईकडून मला ताकद मिळाली आहे. तिच्याकडे प्रचंड कणखरपणा आहे. कितीही कठीण काळ असू देत ती धीराने सामोरं जाते. कधी मी तिला प्रॉब्लेम्सला घाबरतांना पाहिलं नाही. कारण तीच म्हणणं आहे की, अडचणी सोडवायच्या असतात. मी कामाची नैतिकताही तिच्याकडून शिकले. तिला तिचं काम खूप आवडतं. माझी आई ३५ वर्ष जे.जे हॉस्पिटलमध्ये आनंदाने काम करत राहिली कधी कंटाळा केला नाही. आदित्य आणि प्रीतमच्या आईच्या भूमिकेसाठी एक प्रतिक्रिया जी मला सगळ्यांकडून मिळते की अय्यां किती लहान दिसतेस तू, किती मोठी मुलं दाखवली आहेत मालिकेत. अहिल्याच्या भूमिकेची तारीफ करताना प्रेक्षक हे ही बोलतात की खऱ्या आयुष्यात तुम्ही अजून आईपण अनुभवले नाही, पण इतक्या उत्तमपणे अहिल्याची साकारत आहात."