ड्रग्ज प्रकरणात एजाज खानने घेतली आणखी दोन कलाकारांची नावं, हे कलाकार झाले फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 16:45 IST2021-04-03T16:45:15+5:302021-04-03T16:45:47+5:30
एनसीबीने केलेल्या चौकशीत एजाजने आता दोन टिव्ही कलाकारांची नावं घेतली आहेत.

ड्रग्ज प्रकरणात एजाज खानने घेतली आणखी दोन कलाकारांची नावं, हे कलाकार झाले फरार
बॉलिवूड अभिनेता एजाज खानचा ड्रग्ज तस्कराशी संबंध असल्याच्या आरोपावरून अमली पदार्थविरोधी नियंत्रण कक्षाने (एनसीबी) त्याला नुकतीच अटक केली आहे. ड्रग्ज माफिया फारूख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा याच्याशी अमली पदार्थ विक्री आणि सेवन व्यवहारात त्याचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सगळ्यांची सध्या एनसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे.
एनसीबीने केलेल्या चौकशीत एजाजने आता दोन टिव्ही कलाकारांची नावं घेतली असल्याचे म्हटले जात आहे. हे दोन्ही कलाकार अंधेरीतील लोखंडवाला परिसरात राहातात. एजाजने या कलाकारांची नावं घेतल्यानंतर त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. पण त्याआधीच हे कलाकार फरार झाले आहेत. मात्र त्यांच्या घरात ड्रग्स सापडले असल्याचे म्हटले जात आहे.
एजाज खानने एक अभिनेता आणि एका अभिनेत्रीचे नाव घेतले असून या दोघांकडेही भारताचे नागरिकत्व नाहीये. हे दोघेही विदेशी नागरिक असून त्यांचा सध्या पोलिस त्यांचा शोध घेत आहे. तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या कलाकारांची देखील चौकशी केली जात आहे.
एजाज खान बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये झळकला होता. त्याने काही चित्रपट आणि मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ड्रग्स बाळगल्याप्रकरणी 2018 मध्ये देखील एजाजला अटक करण्यात आली होती.