अजिंक्य देव म्हणतो, ही प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 02:11 PM2018-09-22T14:11:11+5:302018-09-23T06:30:00+5:30
'प्रेमा तुझा रंग कसा' या मालिकेतून अजिंक्य देव मराठी टेलिव्हिजनवर बऱ्याच कालावधीनंतर कमबॅक करत आहेत.
'प्रेमा तुझा रंग कसा'च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विशेष बाब म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. अजिंक्य देव यांच्या खास शैलीने या मालिकेतल्या कथांचे नाट्य अधिक खुलणार आहे.
'प्रेमा तुझा रंग कसा' या मालिकेतून अजिंक्य देव मराठी टेलिव्हिजनवर बऱ्याच कालावधीनंतर कमबॅक करत आहेत. याबाबत तो म्हणाला की, 'हिंदी टेलिव्हिजनवर माझी नुकतीच एक सीरिज येऊन गेली. पण मराठी टेलिव्हिजनवर मी खूप दिवसांनंतर दिसणार आहे. मुळात एखादा शो मनापासून आवडला तरच मी तो स्वीकारतो. 'प्रेमा तुझा रंग कसा'चे वेगळेपण मला भावले. याआधी स्टार प्रवाहच्याच 'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाह वाहिनीसोबत असणारे नाते या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखी घट्ट होते आहे याचा विशेष आनंद आहे.'
या कार्यक्रमाचा मुळ उद्देश समाजात जागृकता वाढवणे आहे असे मला वाटते. समाजात घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो. पण त्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि अशा गोष्टींपासून सावध राहण्याचे आवाहन 'प्रेमा तुझा रंग कसा'च्या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी खास असल्याचे अजिंक्य देवने सांगितले.
'प्रेमा तुझा रंग कसा' मालिकेला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल अजिंक्य देवने सांगितले की, सध्या मराठीमध्ये गुन्ह्यांवर आधारित एकही कार्यक्रम नाही. शिवाय प्रत्येक दिवशी नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्येक एपिसोडला नवी गोष्ट आणि नवे कलाकार असल्यामुळेच प्रेक्षकांना सिनेमा पहात असल्याचा फील येईल. समाजात ज्या घटना घडतात त्याचंच प्रतिबिंब या कार्यक्रमामधून दाखवण्यात येते आहे. माझ्यासाठी हा अनुभव समृद्ध करणारा आहे. मला महाराष्ट्रभरातून अभिनंदन करणारे बरेच फोन आले. 'प्रेमा तुझा रंग कसा'चे एपिसोड्स मित्रमंडळी आणि प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.