आकाश नलावडे आणि शिवानी बावकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'साधी माणसं' मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 14:21 IST2024-02-12T14:20:30+5:302024-02-12T14:21:41+5:30
Akash Nalavde and Shivani Baokar : स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका दाखल होणार आहे. या मालिकेचं नाव आहे साधी माणसं (Sadhi Mansa). या मालिकेत आकाश नलावडे आणि शिवानी बावकर एकत्र काम करताना दिसणार आहे.

आकाश नलावडे आणि शिवानी बावकर पहिल्यांदाच दिसणार एकत्र, 'साधी माणसं' मालिकेत
स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवीन मालिका दाखल होणार आहे. या मालिकेचं नाव आहे साधी माणसं (Sadhi Mansa). या मालिकेत आकाश नलावडे (Akash Nalawade) आणि शिवानी बावकर (Shivani Baokar) एकत्र काम करताना दिसणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र. एकाच गावात रहात असले तरी स्वभाव मात्र टोकाचे. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी. घरची परिस्थिती बेताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बाळगणारी. तर सत्या आणि नशिबाचा ३६ चा आकडा आहे. डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत रहाणारा. अशा या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका.
अभिनेता आकाश नलावडे ही नवी भूमिका निभावण्यासाठी खूपच उत्सुक आहे. पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे. साध्या माणसांची ही गोष्ट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असं आकाश म्हणाला.
मालिकेत दिसणार हे कलाकार
अभिनेत्री शिवानी बावकर आणि अभिनेता आकाश नलावडे या मालिकेत मीरा आणि सत्याची भूमिका साकारणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील.