भुवनेश्वरीमुळे अक्षरा-अधिपती सोडणार घर; सुर्यवंशींच्या घराबाहेर पडलेली अक्षरा साजरी करणार वटपौर्णिमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 17:03 IST2024-06-20T17:01:11+5:302024-06-20T17:03:34+5:30
Tula Shikvin Changlach Dhada:घरातून बाहेर पडल्यानंतर अक्षरा तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे.

भुवनेश्वरीमुळे अक्षरा-अधिपती सोडणार घर; सुर्यवंशींच्या घराबाहेर पडलेली अक्षरा साजरी करणार वटपौर्णिमा
सध्या छोट्या पडद्यावरील जवळपास सगळ्याच मालिकांमध्ये वटपौर्णिमा विशेष भाग रंगतांना दिसत आहे. यामध्येच आता तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतही अक्षरा तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. सुरुवातीला अधिपतीचा नवरा म्हणून स्वीकार करण्यास तयार नसलेली अक्षरा आता त्याच्या प्रेमात पडली आहे. त्यामुळे तिच्यासाठी ही वटपौर्णिमा खास ठरणार आहे. मात्र, त्याचसोबत तिला सुर्यवंशी कुटुंबाचं घरही सोडावं लागणार आहे.
सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोनुसार, सुर्यवंशी कुटुंबाच्या रितीप्रमाणे लग्नानंतर अधिपती आणि अक्षरा या दोघांना १० दिवस घराच्या बाहेर रहावं लागणार आहे. या १० दिवसांमध्ये त्यांना त्यांची ओळख लपवायची आहे. इतकंच नाही तर घराबाहेर पडतांना त्यांना कोणतीही घरातली वस्तूसोबत घेऊन जाता येणार नाही असाही याचा नियम आहे. त्यामुळे रीत पाळण्यासाठी अक्षरा-अधिपती घरातून बाहेर पडतात.
दरम्यान, घरातून बाहेर पडल्यानंतर अक्षरा तिची पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. इतकंच नाही तर अक्षराने आपल्यासाठी इतकं करतीये हे पाहून अधिपती सुद्धा तिच्यासाठी उपवास करणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत चक्क अक्षरा आणि अधिपती यांच्यावर एक खास नवीन गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. ‘नवरा हाच हवा’ असे या गाण्याचे बोल असून ते सध्या ट्रेंड होत आहे.