अक्षयनं दोन वेण्याला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 01:32 PM2023-11-09T13:32:38+5:302023-11-09T13:33:17+5:30
मुरांबा मालिकेत अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) अक्षय मुकादमची भूमिका साकारत आहे तर नवोदित अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) रमा या भूमिकेत आहे. दरम्यान आज शिवानीचा वाढदिवस असून तिला शशांकने हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे.या मालिकेची हटके कथा आणि कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) अक्षय मुकादमची भूमिका साकारत आहे तर नवोदित अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) रमा या भूमिकेत आहे. दरम्यान आज शिवानीचा वाढदिवस असून तिला शशांकने हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शशांक केतकरने इंस्टाग्रामवर मुरांबाच्या सेटवर शिवानीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या सेटवर शिवानी झोपलेली असताना अक्षय तिचा व्हिडीओ काढून तिला त्रास देताना दिसतो आहे. व्हिडीओच्या शेवटी शशांक म्हणतोय की, तुला खरंच बरं वाटावं यासाठी हॅप्पी बर्थडे. त्यानंतर त्या दोघांचे फोटो शेअर केले आहेत.
त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तुला तर माहितीच आहे … तुला त्रास देण्यासाठीच मी सेटवर येतो. हॅप्पी बर्थडे शिवानी मुंढेकर मैत्रिणी , तू उत्तम कलाकार आहेसच… असंच झकास काम करत रहा! मोठी हो. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.या पोस्टवर शिवानीनं लिहिलं निःशब्द आणि इमोजी शेअर केले आहेत. तर शशांक शिवानीला त्रास देताना पाहून एकाने लिहिले की, काय गं माझी बिचारी रमा. तर आणखी एका युजरने लिहिले की, हॅप्पी बर्थडे २ वेण्या. आमच्यासाठी तू दोन वेण्याच असणार.या पोस्टमधून चाहते तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
रमा-अक्षयमधला दुरावा संपणार का?
मुरांबा मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे रेवा अक्षयची होण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी ती कुठल्याही थराला जाऊन प्रयत्न करत आहे. गैरसमज झालेली रमा घरी येते तेव्हा अक्षय आणि रेवाला एकत्र पाहून कोलमडून जाते. मात्र तितक्यात अक्षयची आई जाऊन तिला तुला जे दिसतंय ते खरं नाही हे सांगते. तसेच ती अक्षयच्या अपघाताबद्दल सांगते. त्यानंतर रमा अक्षयसोबत राहण्याचा निर्णय घेते आणि काळजी घेते. असं असलं तरी अद्याप अक्षयने आपली फसवणूक केली आहे, त्याचा राग रमाच्या मनातून गेलेला नाही. त्यामुळे अक्षय तिचा गैरसमज कसा दूर करणार हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.