'अल्लादिन: नाम तो सुना होगा' मालिकेत येणार नवा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 07:56 PM2018-12-04T19:56:41+5:302018-12-04T19:56:47+5:30
सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम ता सुना होगा' या मालिकेची खिळवून ठेवणारी पटकथा आणि अप्रतिम कलाकार यामुळे मालिका दिवसेंदिवस नवे टप्पे गाठत आहे.
सोनी सबवरील 'अल्लादिन: नाम ता सुना होगा' या मालिकेची खिळवून ठेवणारी पटकथा आणि अप्रतिम कलाकार यामुळे मालिका दिवसेंदिवस नवे टप्पे गाठत आहे. यास्मिनच्या भूमिकेतील अवनीत कौर आणि अल्लादिनच्या भूमिकेतील सिद्धार्थ निगम असे प्रतिभावंत कलाकार असलेली ही फँटसी मालिका आता एक नवा ट्विस्ट घेऊन येत आहे.
सध्या या मालिकेत अल्लादिन आणि जीनी (राशुल टंडन) राजमहालात पोहोचून अब्बूच्या नावावरील कलंक पुसण्यासाठी कोळशाच्या खाणीत काम करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला लोकांनी खाणीत काम करू नये म्हणून जाफर (आमीर दळवी) त्यांना घाबरवत आहे. मात्र, यास्मिनची मेहनत आणि तिचे प्रेरणादायी बोलणे ऐकल्यानंतर कामगार तिथे काम सुरू ठेवण्याचा निर्णय
घेतात. सुरक्षा कर्मचारी बदलण्याचा आपला निर्णय यास्मिन राजाला सांगते. तर, जाफर राजीनामा देण्याचे नाटक करतो. मात्र, यास्मिन ते नाकारते आणि बगदादचा वझीर म्हणून त्याची पुन्हा एकदा नियुक्ती करते. पण, यामुळे जाफरला सत्तेच्या ताकदीची मस्तवाल नशा चढते आणि तो इतरांना अडकवण्यासाठी सापळे रचू लागतो.
सिद्धार्थ निगम म्हणाला, 'मला अल्लादिनची भूमिका साकारताना फारच मजा येते. मारामारी, जादूने भरलेली दृश्ये चित्रीत करणे ही धमाल आहेच. पण, मी या व्यक्तिरेखेकडून बरेच काही शिकतो देखील आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी आणखी मेहनत घेण्याची प्रेरणाही मला त्यातून मिळते. '
अवनीत कौर म्हणाली,'अल्लादिन आणि यास्मिनचे प्रेम व तिचे आपल्या वडिलांवर असलेले प्रेम आणि आदराची कथा मी कित्येक वर्षे ऐकली आहे. त्यामुळे, परीकथेतल्या या सुंदर तरुणीची भूमिका साकारण्याचा अनुभव फारच छान आहे. सगळे कलाकार आणि क्रू यांच्यात छान नाते निर्माण झाले आहे. चित्रीकरण म्हणजे आमच्यासाठी धमाल असते.'
राशुल टंडन म्हणाला, 'जीनी सगळ्यांनाच आवडतो. पण, त्यामुळेच या भूमिकेत शिरणे आणि त्याचवेळी त्याला न्याय देणे हे माझ्यासाठी आव्हान आहे. अशा प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणे फार प्रेरणादायी आहे. त्यामुळे, पटकथेप्रमाणेच मालिकाही जिवंत होते.'
आमिर दळवी म्हणाला, 'या नकारात्मक भूमिकेला अनेक पदर आहेत. त्यामुळे ती साकारणे हे एक आव्हान आहे. जाफरचे अनेक मूड्स असतात, त्यामुळे ही भूमिका करताना मजा येते. अल्लादिन या मालिकेचा भाग असणे ही आनंदाची बाब आहे. कारण, यातील प्रत्येक भागात एक नवा ट्विस्ट असतो.'