‘लिटिल चॅम्प’ आस्थाला दिले अमालने आपले जाकीट भेट !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:07 PM2019-04-01T15:07:31+5:302019-04-01T15:08:08+5:30
‘आरएडब्ल्यू (रॉ)’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आणि बालस्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी जॅकी श्रॉफ आणि मौनी हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
‘झी टीव्ही’वरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातील बालस्पर्धक पुढील फेरीत जाण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करत असल्याने ही स्पर्धा दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे. या स्पर्धेचे हे उत्साह दिवसेंदिवस अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. वीकेण्डच्या भागात बॉलीवूडचा लाडका ‘जग्गूदादा’ ऊर्फ जॅकी श्रॉफ अभिनेत्री मौनी रॉय हिच्यासह या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. आपल्या आगामी ‘आरएडब्ल्यू (रॉ)’ या चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी आणि बालस्पर्धकांना शुभेच्छा देण्यासाठी जॅकी श्रॉफ आणि मौनी हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या भागात सर्वच बालस्पर्धकांनी आपापल्या क्षमतेनुसार उत्तम गाणी गायली, तरी एक ‘लिटिल चॅम्प’ आस्था दासने ‘कुरबान’ चित्रपटातील गायलेल्या ‘कुरबाँ हुआ’ या गाण्याने सर्वांची मने जिंकली. पण परीक्षक अमाल दास तिच्या गाण्याने भारावून गेला होता आणि काही काळ त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. पण अमाल तिच्या गाण्यावर इतका फिदा झाला की तो आपल्या जागेवरून उठून तिच्यापर्यंत चालत गेला आणि त्याने तिला आपल्या अंगातील जाकीट घातले. अमाल म्हणाला, “एखाद्या रॉकस्टारला शोभेसं गायली आहेस तू. मी तर तुझ्या गाण्याने अवाक झालो आहे. तुझं हे गाणं ऐकणयासाठी मी इथे उपस्थित होतो, हे माझं नशिबच म्हणावं लागेल. गाण्यातील तू वाघीणच आहेस.”
याशिवायही या भागात अन्य बालस्पर्धकांनी अप्रतिम गाणी सादर केली आणि ती ऐकून केवळ परीक्षकच नव्हे, तर जॅकी आणि मौनी हे सेलिब्रिटी अतिथीही भारावून गेले. जॅकीने प्रीतम आचार्यला संदेसे आते है हे गाणे गाण्याची विनंती केली. त्यानंतर मिथिलाने तनहा तनहा यहाँ पर जीना हे रंगीलातील गाणे गायले तेव्हाही जॅकी आनंदून गेला. त्याने मिथिला मदत करीत सलेल्या 21 मुलींच्या शिक्षणचा खर्च उचलण्याची तयारी दर्शविल्यावर मिथिलाचेही मन भरून गेले. यानंतर मौनी रॉयने काही स्पर्धकांबरोबर व्यसपिठावर आपले प्रसिध्द नागिन नृत्य करून सर्वांवर आपली छाप पाडली.
यानंतर घडलेल्या एका प्रसंगाने जॅकी श्रॉफ काहीसा भावनावश झाला. त्याने आपले लहानपण ज्या चाळीत व्यतीत केले होते, त्या चाळीतील त्याच्या शेजारी राहणार््या कुटुंबांनी सेटवर येऊन त्याची भेट घेतली. त्यांनी लहानपणीच्या जॅकीच्या काही आठवणी सांगितल्या आणि सांगितले की इतके यश मिळाल्यावरही जॅकी बदललेला नाही. त्याचे पाय आजही जमिनीवरच आहेत. एकंदरीतच ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या या भागात बालस्पर्धकांच्या अप्रतिम गायनाबरोबरच धमाल मनोरंजन आणि काही संस्मरणीय क्षण अनुभविण्यास मिळतील.