KBC मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न; व्हिडिओ व्हायरल होताच चॅनेलने दिले स्पष्टीकरण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 20:00 IST2023-11-17T19:59:37+5:302023-11-17T20:00:02+5:30
अमिताभ बच्चन यांचा केबीसीच्या मंचावरील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

KBC मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न; व्हिडिओ व्हायरल होताच चॅनेलने दिले स्पष्टीकरण...
Amitabh Bachchan KBC: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती' शो होस्ट करत आहेत. देशभरातील हजारो लोक या शोमध्ये आपले नशीब आजमावतात. नेहमीप्रमाणे यंदाचे सीझनही प्रेक्षकांना खूप आवडले आहे. दरम्यान, केबीसीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे चॅनेलला स्पष्टीकरण द्यावे लागले.
केबीसीचा व्हिडिओ व्हायरल
या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन एका स्पर्धकाला मध्य प्रदेशच्या कमलनाथ सरकारबद्दल प्रश्न विचारत आहेत. कमलनाथ यांच्या सरकारने किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती? असा प्रश्न विचारला जातो. यानंतर चार पर्याय दिले जातात अन् स्पर्धक 27 लाख, हा पर्याय निवडतो. हे उत्तर बरोबर असल्याचेही सांगितले जाते. पण, हा व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले आहे.
चॅनलने हा व्हिडिओ शेअर केला असून तो बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. हा प्रश्न कोणत्याही स्पर्धकाला विचारण्यात आला नव्हता. सोनी टीव्ही चॅनलने आपल्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टाग्राम हँडलद्वारे या व्हिडिओचे सत्य उघड समोर आणले आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'कौन बनेगा करोडपतीचा हा बनावट व्हिडिओ लोकांची दिशाभूल करत आहे. अशा चुकीच्या माहितीचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही या प्रकरणी सायबर सेलशी संपर्क साधला आहे. तुम्हाला योग्य एपिसोड बघायचा असेल तर आमच्या YouTube चॅनेलवर जा.
— sonytv (@SonyTV) November 17, 2023
सोशल मीडियावर या फेक व्हिडिओवर यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. बनावट व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी चॅनल आणि शोवर टीका केली होती. मात्र, आता वाहिनीवरून सत्य बाहेर आल्यानंतर गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.