एका आईची काळजाला भिडणारी व्यथा ऐकून भावूक झाले बिग बी, म्हणाली - फक्त २० वर्षेच जगणार मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 05:39 PM2019-09-03T17:39:31+5:302019-09-03T17:40:14+5:30
'कौन बनेगा करोडपती'मधील एका महिलेची कथा ऐकून अमिताभ बच्चन भावूक झाले.
अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय रिएलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'मधील स्पर्धक पैशांसोबत लोकांची मनं देखील जिंकत आहेत. तर काही स्पर्धकांच्या जीवनातील कथा काळजाला भिडणाऱ्या असतात की त्यामुळे लोक भावूक होतात. आगामी भागात अशी एक स्पर्धक येणार आहे जिची कथा ऐकून अमिताभ बच्चनदेखील भावूक झाले.
जयपूरला स्थायिक असणाऱ्या अर्पिता यादव कौन बनेगा करोडपती शोमध्ये सहभागी झाल्या. त्या दृष्टीहीन मुलांची शिक्षिका असून त्यांचा मुलगा स्पेशल चाइल्ड आहे. सोनी टेलिव्हिजनने एक प्रोमो प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये अर्पिता खेळाच्या मध्ये त्यांचा मुलगा निर्भयच्या जन्माच्या वेळची गोष्ट शेअर करताना दिसते आहे. मुलाची कथा सांगताना अर्पिता रडू लागल्या.
त्यांनी सांगितलं की, आता त्यांना त्यांच्या मुलाचा खूप गर्व वाटतो. मात्र ज्यावेळी त्याचा जन्म झाला होता त्यावेळी त्या देवावर खूप नाराज होत्या. त्या म्हणाल्या की, जेव्हा निर्भयचा जन्म झाला तेव्हा त्याला पाहून माझ्या मनात विचार आला की मी तर हे मागितलं नव्हतं. मी देवाशी भांडले. स्वतःशी, समाज व कुटुंबावर खूप नाराज झाली होती. एक मोठी लढाई लढली.
अर्पिता यांनी पुढे सांगितलं की, त्यांच्या मुलाच्या आजारावर कोणताच उपाय नाही. त्याचं वय कमी आहे. तो जास्तीत जास्त २० वर्षच जगू शकतो. अर्पिता यांची व्यथा ऐकून अमिताभ बच्चन यांनी त्यांचे धैर्य वाढविले व कविताही म्हटली.