कौन बनेगा करोडपतीमुळे या मालिकांना बसणार फटका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:46 IST2019-04-29T13:45:55+5:302019-04-29T13:46:47+5:30
कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम ऑगस्टमध्ये सुरू होणार असून नेहमीप्रमाणेच रात्री 9 ते 10 या वेळात प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

कौन बनेगा करोडपतीमुळे या मालिकांना बसणार फटका?
हॉट सीटवर आहे फक्त शहेनशहाचे राज्य... शहेनशहा.. अर्थात बिग बी अमिताभ बच्चन.... रसिकांचा सगळ्यात फेव्हरेट शो ‘कौन बनेगा करोडपती’चे अकरावे पर्व लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा नुकतीच करण्यात आली. या सिझनचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन १ मे ला रात्री नऊ वाजल्यापासून करता येणार आहे. या नव्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन प्रेक्षकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसत आहेत. आशा सोडू नका असेही ते म्हणताना दिसत आहेत.
कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम ऑगस्टमध्ये सुरू होणार असून नेहमीप्रमाणेच रात्री 9 ते 10 या वेळात प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. टेली चक्करने दिलेल्या वृत्तानुसार, लेडीज स्पेशल ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याची जागा कौन बनेगा करोडपती घेणार आहे. 'लेडीज स्पेशल' या मालिकेत प्रेक्षकांना तीन महिलांच्या आयुष्यात येणारे चढउतार पाहायला मिळत असून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेत गिरीजा ओक, बिजल जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच 9.30 वाजता प्रक्षेपित होत असलेली पटियाला बेब्स या मालिकेचा वेळ कौन बनेगा करोडपती या मालिकेमुळे बदलला जाणार असल्याचे वृत्त देखील देण्यात आले आहे.
‘कौन बनेगा करोडपती’या कार्यक्रमाच्या अकराव्या सिझनची टॅगलाईन देखील खूपच छान आहे. अगर कोशिश रखोगे जारी, तो केबीसी हॉट सीट पर बैठने की इस बार आपकी होगी बारी (तुम्ही सतत प्रयत्न केला तर या वेळी हॉट सीटवर बसण्याची तुम्हाला नक्कीच संधी मिळेल.) या प्रोमोमध्ये गेल्या सात वर्षांपासून या कार्यक्रमात सहभागी व्हायचा प्रयत्न करत असलेल्या महिलेला अमिताभ सल्ला देताना दिसत आहेत. आशा सोडू नका, पुन्हा एकदा प्रयत्न करा... असे त्या महिलेला ते सांगत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी देखील हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे ट्वीटरद्वारे त्यांच्या चाहत्यांना सांगितले होते. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते की, मी अमिताभ बच्चन २०१९ मधील एका नवीन अभियानाला सुरुवात करत आहे. कौन बनेगा करोडपती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
T 3089 - आदर आदाब अभिनंदन आभार ! मैं अमिताभ बच्चन प्रस्तुत करने जा रहा हूँ , इस वर्ष २०१९ का नया अभियान ... कौन बनेगा करोड़पति ... KBC !!🙏🙏❤️❤️🤗🤗🌹🌹
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 13, 2019
बहुत जल्द आपके घरों में !! pic.twitter.com/mzeLj36Wfh