Bigg Boss Marathi 4 : देवेंद्रजी जिंकू शकत नाही..., अमृता फडणवीस यांचं ‘बिग बॉस’च्या घरातील वक्तव्य चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 03:16 PM2022-10-27T15:16:25+5:302022-10-27T15:19:12+5:30
Bigg Boss Marathi 4, Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी नुकतीच बिग बॉस मराठीच्या घरात हजेरी लावली होती. सध्या अमृता यांचे ‘बिग बॉस मराठी4’च्या घरातील एक ना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत....
Bigg Boss Marathi 4 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सध्या ‘बिग बॉस मराठी4’मुळे चर्चेत आहेत. अमृता यांनी ‘बिग बॉस मराठी4’च्या घरात एन्ट्री घेतली आणि एकच चर्चा रंगली. यावेळी अमृता घरातील स्पर्धकांसोबत धम्माल मस्ती करताना दिसल्या. सध्या अमृता यांचे ‘बिग बॉस मराठी4’च्या घरातील एक ना अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कलर्स मराठी या वाहिनीनेही आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही प्रोमो शेअर केले आहेत. या व्हिडीओंमध्ये अमृता फडवणीस किरण माने आणि यशश्री यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत आहेत.
‘तुमच्या जोडीपैकी म्हणजेच देवेंद्र फडणवीस किंवा अमृता फडणवीस यांच्यापैकी कोणाला वाटतं की ते बिग बॉसमध्ये आले तर ते जिंकू शकतात?,’असा प्रश्न यशश्रीने अमृता यांना विचारला. यावर उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘देवेंद्रजी जिंकू शकत नाहीत. कारण त्यांना घरी जायचं असतं ना... देवेंद्रजी बिग बॉस आहेत आणि मी सगळे निर्णय घेते....’
किरण माने यांनीही अमृता यांना प्रश्न विचारले. ‘महाराष्ट्राचं एक राजकीय वर्तुळ आहे ते म्हणजे एक बिग बॉस आहे. तर त्यातले टॉप 5 सदस्य कोण वाटतात तुम्हाला?,’ असा प्रश्न मानेंनी केला. यावर अमृता फडणवीस म्हणतात, ‘आपल्याला डॅशिंग लोक पाहिजे जे कधीही काही बोलू शकतात आणि आग लावू शकतात. ’पुढे किरण माने विचारतात आमच्यासारखे तुमच्यातही वाद होत असतील ना? मी हे नाही करणार ते नाही करणार....? यावर अमृता फडणवीस म्हणतात, आपला नवरा हाती तर लागला पाहिजे ना काम द्यायला....
‘बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन पदाला फार महत्त्व आहे. ते खूप महत्वाचे असते. पण बिग बॉसच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे, त्याचा कॅप्टन कोण? असा एक प्रश्न अमृता यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाचं अमृता फडणवीसांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ‘मी तुम्हाला दोन नाव सांगते, सध्या ते महाराष्ट्राचे कॅप्टन आहेत. यातील एक व्यक्ती प्रॅक्टिकल आणि एक इमोशनल कॅप्टन आहे. या कॅप्टनपैकी पहिले नाव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले कॅप्टन आहेत. दुसरे कॅप्टन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत...’