Amruta Devendra Fadnavis: “देवेंद्रजी पातेलंभर तुपासह ३५ पुरणपोळ्या सहज खायचे”; अमृता फडणवीसांनी सांगितली खास आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:28 PM2022-02-16T17:28:32+5:302022-02-16T17:31:26+5:30
Amruta Devendra Fadnavis: अमृता फडणवीस यांनी देवेंद्रजींबद्दलच्या अनेकविध आठवणी एका कार्यक्रमात शेअर केल्या आहेत.
मुंबई: भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) नेहमी चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस राजकीय क्षेत्रात आक्रमकपणा आणि ठामपणा यामुळे प्रसिद्ध आहेत. अमृता फडणवीस यांची ओळख केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणून नाही, तर नावाजलेल्या गायिका आणि बँकिंग क्षेत्रातील यशस्वी महिला म्हणूनही आहे. अमृता फडणवीस झी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ (Kitchen Kallakar) या कार्यक्रमात सहभागी होणार असून, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या अनेक आठवणी यावेळी अमृता फडणवीस यांनी शेअर केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या ग्लॅमरस पत्नी, सजग आई, प्रेमळ सून, बँकर, निर्मात्या, गायिका, टेबल टेनिस चॅम्पियन, परफॉर्मर अशी अमृता फडणवीस यांची ओळख यावेळी करून देण्यात आली. यानंतर अमृता फडणवीस यांनी सांगितले की, आमच्या फ्रीजमधून मध्यरात्री पदार्थ गायब व्हायचे. त्यामुळे मी सीआयडी लावली. मी त्यांची संगिनी आहे. फ्रीज बदलले आणि कुलूप किल्ल्यांचे फ्रीज आणले. फ्रीजच्या चाव्या मी माझ्याकडे ठेवते, असा गमतीदार किस्सा अमृता फडणवीस यांनी सांगितला.
देवेंद्रजी पातेलंभर तुपासह ३५ पुरणपोळ्या सहज खायचे
एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात, असा प्रश्न अमृता फडणवीस यांना सूत्रसंचालक असलेला प्रसिद्ध अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेने विचारला. यावर, ते ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असे उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती, या प्रश्नावर त्यांना ३० ते ३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असे मिश्किल उत्तर मिसेस फडणवीस यांनी दिले.
असे प्रश्न विचारू नका, जगणे मुश्किल होऊ शकते
‘किचन कल्लाकार’या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले. या कार्यक्रमात महाराजांच्या भूमिकेत असलेले प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी देवेंद्र फडणवीस यांची फिरकी घेतल्याचेही पाहायला मिळाले. माझी आई आणि बायको जेवण बनवतात, आणि विचारतात, कोणाचे चांगले झालेय, तेव्हा पंचाईत होते. तर तुम्ही मला सांगा, की तुमच्या आईच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, आणि अमृताताईंच्या हातचा कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, मुळात आवडतो की नाही, असा प्रश्न प्रशांत दामले यांनी विचारल्यावर, खरे म्हणजे प्रशांतजी असे प्रश्न कधीच विचारु नयेत. कोणी विचारलेच, तर लक्षात ठेवावे की आईला म्हटले की तुझ्यापेक्षा पत्नीच्या हातचा एखादा पदार्थ जास्त आवडतो, तर आईला कधीच राग येत नाही. याच्या उलट केले, तर जगणे मुश्किल होऊ शकते. त्यामुळे असे प्रश्न विचारत जाऊ नका, असे खोचक उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.