'अनिरुद्ध देशमुखमध्ये १०० टक्के दुर्गुण आहेतच, पण...'; मिलिंद गवळीची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:33 AM2021-12-22T10:33:16+5:302021-12-22T10:33:41+5:30
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मधील अनिरूद्ध देशमुख उर्फ मिलिंद गवळी(Milind Gawali)ची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मध्ये सध्या अभिषेक आणि अनघाच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या मालिकेत अनिरूद्ध देशमुखची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी (Milind Gawali)ने साकारली आहे. तो सोशल मीडियावर सक्रीय असून तो नेहमी मालिकेतील सीन्सवर किंवा महत्त्वाच्या भागावर आपले मत मांडत असतो. दरम्यान नुकतीच त्याने मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत आपले मत मांडले आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
मिलिंद गवळीने आई कुठे काय करतेचा नवीन प्रोमो शेअर करत लिहिले की, बाबा..तुला जिंकलंच पाहिजे. खरंच प्रत्येकाला आपला बाबा जिंकावा असंच वाटत असतं, प्रत्येकाचा बाबा त्याच्यासाठी हिरोच असतो, ईशा जेव्हा ओरडून तिच्या बाबांना असं म्हणते की तुम्ही जिंकायलाच पाहिजे, माझ्या काळजाचा ठोका चुकला, वाटलं या लेकरांसाठी आपल्याला जिंकायला पाहिजे, या लेकरांसाठी आयुष्य जगायला पाहिजे, या लेकरांसाठी प्रयत्न करायला पाहिजे.
त्याने पुढे म्हटले की, अनिरुद्ध देशमुखमध्ये १०० टक्के दूर्गुण असतील, असतील नाही आहेतच,पण एक महत्त्वाचा, चांगला, गुण त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे अनिरुद्ध देशमुख चांगला बाबा होण्याचा प्रयत्न करत असतो, सतत, त्याच्या मुलांसाठी काही पण, अनिरुद्ध देशमुख शेवटी मुलांसाठी काहीतरी चांगलं करून जाईल, असं सारखं मला वाटतं. या रुमाल पाणी खेळामध्ये आशुतोष केळकर अनिरुद्ध देशमुखला जिंकण्यासाठी मदत करतो.
'बाबा जिंकला की कुटुंब जिंकतं' - मिलिंद गवळी
आशुतोष अतिशय चांगला आणि सज्जन माणूस आहे, त्याला अनिरुद्धला हरवायचं आहे, पण ईशाचा बाबा हरायला नको असं त्याला वाटतं आणि तो रुमाल सोडून देतो. खरंच प्रत्येकाचा बाबा जिंकला पाहिजे, बाबा जिंकला की कुटुंब जिंकतं, आईला कॉम्पिटिशन नसतं, ती जिंकलेली असते, पण म्हणून बाबा पण जिंकायला हवा. माझ्या तुमच्या बाबांसाठी खूप शुभेच्छा, त्यांनी कायम जिंकत राहावं, तुम्हा सर्वांचे बाबा कायम यशस्वी आणि आनंदी रहावेत, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.