'सूर नवा ध्यास नवा'चा आगळावेगळा उपक्रम, विजेतेपद मिळवण्याआधीच स्पर्धकांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 05:22 PM2022-08-06T17:22:42+5:302022-08-06T17:23:21+5:30

Sur Nava Dhyas Nava : रिॲलिटी शोच्या इतिहासात एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या लाडक्या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलंय.

Another bold venture of 'Sur Nava Dhyas Nava' | 'सूर नवा ध्यास नवा'चा आगळावेगळा उपक्रम, विजेतेपद मिळवण्याआधीच स्पर्धकांना...

'सूर नवा ध्यास नवा'चा आगळावेगळा उपक्रम, विजेतेपद मिळवण्याआधीच स्पर्धकांना...

googlenewsNext

रिॲलिटी शोच्या इतिहासात एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम घेऊन कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा (Sur Nava Dhyas Nava) या लाडक्या कार्यक्रमाचं यंदाचं पाचवं पर्व रसिकांच्या भेटीला आलंय. सुरेल स्पर्धक, कुशल वाद्यमेळ, अभ्यासू सूत्रधार आणि नवोदित गायकांना पैलू पाडणारे पारखी परीक्षक यांनी सजवलेली सुरेल मैफल ही जरी “सूर नवा”ची आजवरची ओळख असली तरी आता आणखी एक नवी ओळख नि नवा ध्यास घेऊन सूर नवाचा हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला आहे.  संगीतमय रिॲलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा आणि एकमेवाद्वितीय असा उपक्रम आहे. 

प्रत्येक आठवड्यात “सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर आपलं गाणं उत्तमोत्तम रित्या सादर करण्याचा ध्यास घेऊन सर्वोत्तम ठरणारा त्या त्या आठवड्यातील गायक सुवर्णकट्यार मिळवण्याचा मान मिळवतो. या पर्वात सुवर्णकट्यारीचा मान मिळवणाऱ्या त्या आठवड्यातील गायकाला मराठी संगीत क्षेत्रातील नावाजलेल्या संगीतकाराकडे सोपवले जाणार आणि त्या संगीतकाराकडून आपलं स्वतःचं नवंकोरं गाणं मिळवण्याची सुवर्णसंधी त्या गायकाला मिळणार आहे. “सूर नवा ध्यास नवा “च्या या अभिनव उपक्रमातील ही पहिलीच सुवर्णसंधी सांगलीच्या शुभम सातपुते या गुणी गायकाने मिळवली असून विचारशील प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं आणि कवी- गीतकार मिलिंद जोशी यांनी लिहिलेलं एक सुरेख नवं गाणं शुभम सातपुते याच्या नावावर नोंदवलं गेलं आहे.


प्रत्येक स्पर्धेत एकच विजेता असतो नि तोच बऱ्याचदा ठळकपणे दिसतो. पण सूर नवाच्या या स्पर्धेचं, या पर्वाचं वेगळेपण असं की, प्रत्येक आठवड्याचा सर्वोत्तम गायक हा एक विजेता असणार आहे. त्याच्या नावावर त्याचं स्वतःचं गाणं नोंदवलं जाणार आहे. कुठल्याही स्पर्धकाला याहून मोठी गोष्ट काय असणार. पार्श्वगायक म्हणून या मंचावरच त्याची ओळख प्रस्थापित होणं यापेक्षा त्याला मोठं बक्षिस काही असूच शकत नाही.  आणि हे फक्त सूर नवाच्या मंचावरच घडू शकतं, असं अभिमानाने सांगावंसं वाटतं!“ असं या उपक्रमाविषयी बोलताना सूर नवा ध्यास नवाचे परीक्षक आणि निर्माते अवधूत गुप्ते म्हणाले. 


सूर नवाच्या या नव्या धाडसाबद्दल बद्दल बोलताना संगीतकार कौशल इनामदार म्हणाले की, “चित्रपटांव्यतिरिक्त गाणी ही एकेकाळी मराठी भावसंगीताची जीवनरेखा होती. मात्र आज ती गाणी तितक्या प्रमाणात बनत नाही. तशा चित्रपटविरहित गाण्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक ती आर्थिक इको सिस्टिम तयार करण्याची गरज होती नि या स्पर्धेच्या निमित्ताने कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने ती इको सिस्टिम तयार केली. शुभमसाठी नवं गाणं करताना त्या गाण्याच्या निमित्ताने मला नवीन होता आलं. मी आणि गीतकार मिलिंद जोशी शुभमच्या वयाचे झालो. त्या दृष्टीने हे गाणं आंम्हाला ताजंतवानं करणारं गाणं आहे नि हा आमच्याकरता खरंच आनंददायी अनुभव होता. 
“सूर नवा” च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात खूप कौतुक होत असून हे नवंकोरं पहिलं गाणं सूर नवा कार्यक्रमात रसिकांच्या भेटीला येत आहे. 

Web Title: Another bold venture of 'Sur Nava Dhyas Nava'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.