"त्यांना कडक शिक्षा करा..", 'अनुपमा' फेम अभिनेत्याने मुख्यमंत्री शिंदे अन् फडणवीसांकडे केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:49 AM2024-03-20T11:49:53+5:302024-03-20T11:58:53+5:30
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'अनुपमा' मधील अभिनेत्याने पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केलं मदतीचं आवाहन केलंय. नेमकं प्रकरण काय?
'अनुपमा' मालिका ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका. TRP च्या शर्यतीत 'अनुपमा' मालिका कायम अव्वल असते. अशातच 'अनुपमा' मधील लोकप्रिय अभिनेता सुधांशू पांडेने थेट पंतप्रधान मोदींकडे मदतीचं आवाहन केलंय. मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध सुधांशू यांनी आवाज उठवला आहे. नेमकं प्रकरण काय? आम्ही तुम्हाला सांगतो. सुधांशू यांनी इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून सर्व घटना सांगितली आहे.
सुधांशू यांनी एक सीसीटीव्ही फुटेज व्हिडीओ शेअर केलाय. पुढे त्यांनी लिहीलंय की, "जयसाठी मला न्याय पाहिजे. एका मुक्या प्राण्याच्या आयुष्याची किंमत फक्त ५० रुपये. मुक्या प्राण्याचा जीव घेणाऱ्याला फक्त ५० रुपये नुकसान भरपाई भरावी लागते. या गोष्टीला बदलावं लागेल. हा व्हिडीओ जास्तीतजास्त शेअर करुन सरकारपर्यंत पोहोचवा. तुम्हा सर्वांच्या समर्थनाची आणि मदतीची आवश्यकता आहे."
सुधांशू पांडे पुढे लिहीतात, "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार असं काम करतंय जे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर क्वचितच कोणी केलं असेल. सध्याच्या भारत सरकारने देशाचा चेहरामोहरा बदलायचं काम केलंय. त्यामुळे मी आपलं सरकार, पंतप्रधान मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ठोस कायदा बनवावा. त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या माणसांना कडक शिक्षा द्या. आणि नियमांत बदल करा."