Anupamaa : बाबा मला 7 नंतर घराबाहेर पडू द्यायचे नाहीत..., ‘अनुपमा’ फेम रूपाली गांगुलीचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 11:43 AM2022-06-21T11:43:17+5:302022-06-21T11:44:15+5:30
Anupamaa : छोट्या पडद्यावरची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून रूपाली गांगुली ओळखली जाते. पण तिचा प्रवास सोपा नव्हता. रूपालीच्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला तिच्या वडिलांचा प्रखर विरोध होता.
टीव्हीच्या दुनियेत टीआरपी चार्टवर आपला दबदबा कायम ठेवणारी मालिका कोणती तर ‘अनुपमा’ (Anupamaa ). या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. कथा दमदार आहेच पण मालिकेची स्टारकास्टही तितकीच दमदार आहे. अनुपमाची भूमिका साकारते आहे ती अभिनेत्री रूपाली गांगुली ( Rupali Ganguly ). वनराजच्या रोलमध्ये आहे सुधांशू पांडे आणि काव्याचा निगेटीव्ह रोल साकारला आहे तो मदालसा शर्मा हिने. कहाणीच्या अनुषंगाने एक एक पात्र अगदी विचारपूर्वक निवडलं आहे.
‘अनुपमा’ या मालिकेचा आत्मा आहे आणि ही भूमिका रूपालीने अगदी बेमालुमपणे साकारली आहे. छोट्या पडद्यावरची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून रूपाली गांगुली ओळखली जाते. पण तिचा प्रवास सोपा नव्हता. रूपालीच्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला तिच्या वडिलांचा प्रखर विरोध होता. आपल्या लेकीनं अभिनयाऐवजी वेगळ्या क्षेत्रात जावं, असं त्यांना वाटे. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द रूपालीने हा खुलासा केला.
संध्याकाळी 7 नंतर घराबाहेर पडण्यास होती मनाई...
तिने सांगितले, माझे वडिल अनिल गांगुली हे मोठे दिग्दर्शक व पटकथा लेखक होते. ते मोकळ्या मनाचे होते. माझ्यावर त्यांचा जीव होता. पण मला संध्याकाळी 7 च्या नंतर घराबाहेर पडण्यास मनाई होती. मी संध्याकाळी 7 नंतर बाहेर जाऊ नये, याबद्दल ते आग्रही होते. बाबा, असं का वागतात? असा प्रश्न मला तेव्हा पडायचा. अनेकदा त्यांच्या या वागण्याचा रागही यायचा. पण वाढत्या वयासोबत यामागचं कारण आपसूक कळत गेलं. त्यांना आमची काळजी होती. आमच्या सुरक्षेसाठी ते तसं वागायचे. मी अभिनय क्षेत्रात येऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. मला अभिनयक्षेत्रात यायचं आहे, असं मी सांगितल्यावर ते माझ्यावर नाराज झाले होते. देवाने मेंदू दिला आहे, तर एखादं चांगलं आणि योग्य काम कर. अभिनय करुन काय होणार? असं ते मला म्हणाले होतं. त्यावेळी आजच्या सारख्या मालिक तयार होत नसत. फक्त चित्रपट बनायचे,असं रूपालीने सांगितलं.
रुपाली गांगुलीचे वडील अनिल गांगुली हे 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध दिग्दर्शक होते. त्यांनी कोरा कागज, तपस्या सारखे सुपरहिट चित्रपट त्यांनी बनवले.