अरबाज खान आणि मलायका अरोरा या कारणासाठी येणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 14:22 IST2019-06-27T14:21:42+5:302019-06-27T14:22:43+5:30
अरबाज खान आणि मलायका अरोरा एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.

अरबाज खान आणि मलायका अरोरा या कारणासाठी येणार एकत्र?
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचा घटस्फोट होऊन काही महिने झाले असून ते दोघे आता जुन्या गोष्टी विसरून आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. अरबाज सध्या त्याची गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत फिरताना दिसत आहे तर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा आहे. पण आता ते दोघे एका कार्यक्रमासाठी एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.
नच बलिये या कार्यक्रमाच्या आजवरच्या सगळ्या सिझनना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमाचे नवे सिझन प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार असून या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या या सिझनचा निर्माता हा बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे. या कार्यक्रमात नेहमीच आपल्याला खऱ्या आयुष्यातील जोडपी विविध गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करताना दिसतात. पण यंदाच्या सिझनचा कॉन्सेप्ट पूर्णपणे वेगळा असून सध्याच्या कपलसोबतच आता पूर्व प्रेयसी आणि पूर्व प्रियकर या कार्यक्रमात येऊन डान्स परफॉर्मन्स देणार आहेत. त्यामुळे या सिझनमध्ये पती-पत्नी, प्रेयसी-प्रियकर यांसारख्या जोड्यांसोबतच पूर्वप्रियकर-पूर्वप्रेयसी यांच्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्यामुळेच नच बलिये एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
नच बलिये या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची घोषणा झाल्यापासूनच या कार्यक्रमात कोणते स्पर्धक असणार आणि या कार्यक्रमाचे परीक्षक कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे परीक्षक अरबाज खान आणि मलायका अरोरा असणार असल्याचे म्हटले जात आहे. मलायका ही खूपच चांगली डान्सर असून अरबाजला देखील चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे आणि त्याचमुळे त्या दोघांचा या कार्यक्रमाच्या परीक्षकपदी विचार केला जात असल्याची चर्चा आहे.
नच बलिये या कार्यक्रमाचा नवा सिझन जुलै महिन्यात सुरू होणार असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.