आर्ची-परश्याचा 'सैराट' आता हिंदीत आणि तोही छोट्या पडद्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 08:01 PM2019-05-13T20:01:44+5:302019-05-13T20:02:05+5:30
रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांचा लोकप्रिय ठरलेला चित्रपट 'सैराट' आता अँड टीव्हीवर मालिकारुपी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपट २०१६ साली रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सशक्त कथानकासोबत आर्ची परशाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. या चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक 'धडक' प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला देखील रसिकांची दाद मिळाली. त्यानंतर आता या चित्रपटाची हिंदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांचा लोकप्रिय ठरलेला चित्रपट 'सैराट' आता अॅण्ड टीव्हीवर मालिकारुपी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेचे शीर्षक 'जात ना पूछो प्रेम की' असे ठेवण्यात आले आहे.
या मालिकेत 'शाका लाका बूम बूम' या मालिकेतील अभिनेता किंशूक वैद्य आणि अभिनेत्री प्रणाली राठोड आर्ची आणि परशाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आर्ची-परशाची ही कथा मालिकेत उत्तर प्रदेशमध्ये घडताना पहायला मिळणार आहे.
'जात ना पूछो प्रेम की' या मालिकेची घोषणा करत अँड टीव्हीचे विष्णु शंकर यांनी ‘चित्रपटात दाखवण्यात आलेली कथा प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी आणि त्यासाठी टीव्ही सर्वांत उत्तम माध्यम असल्याचे म्हटले आहे.
'सैराट' चित्रपटात जातीव्यवस्थेचा, जाती-धर्मापलीकडे फुललेल्या निष्पाप प्रेमाचा, प्रेमातून बाहेर पडल्यानंतरच्या वास्तवाचा आणि पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही न बदलेल्या गोष्टी रेखाटण्यात आल्या आहेत. या चित्रपटातून रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातून या दोघांना खूप प्रसिद्धी मिळाली. आता या चित्रपटाची मालिका येत असल्याचे समजल्यावर या चित्रपटाचे चाहते ही मालिका पाहण्यास खूप उत्सुक आहेत.