‘रामायण’ने अरूण गोविल यांना अफाट लोकप्रियता दिली, पण...!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 11:24 AM2020-03-29T11:24:59+5:302020-03-29T16:26:54+5:30
अरूण गोविल यांची खंत ...
८० च्या दशकात आलेल्या ‘रामायण’ या मालिकेइतकी लोकप्रियता खचितच कुण्या मालिकेला मिळाली असेल. मालिकेतील कलाकारांना आजही अनेक लोक देवासारखे मानतात. या मालिकेत अरूण गोविल यांनी प्रभू रामाची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेली ही भूमिका इतकी अफाट गाजली की, लोक चक्क घरामध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो म्हणून त्यांचा फोटो लावू लागले होते़ आजही अरूण गोविल यांच्या लोक पाया पडतात, एकंदर काय तर या मालिकेने अरूण गोविल यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. पण सोबत त्यांचा एक तोटाही केला. होय, खुद्द अरूण गोविल यांनी एका ताज्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता.
‘गेल्या १४ वर्षांत मी चित्रपट किंवा मालिका केल्या नाहीत. काही कार्यक्रमात विशेष पाहुण्याच्या भूमिकेत मी दिसलो पण यापलिकडे मी काहीच केले नाही. या मालिकेने मला लोकप्रियता दिली मात्र माझे बॉलिवूडमधील करिअर मात्र या मालिकेसोबतच संपले. कारण या मालिकेनंतर कोणताही निर्माता मला काम देईना, अशी खंत अलीकडे एका मुलाखतीत अरूण गोविल यांनी बोलून दाखवली होती.
होय, रामायण सुरु होण्याआधी अरूण गोविल हिंदी चित्रपटात काम करत होते. याचदरम्यान रामायणमध्ये त्यांनी रामाची भूमिका साकारली. रामायण ही मालिका संपल्यानंतर अरूण गोविल यांना बॉलिवूडमध्ये परतायचे होते. पुन्हा चित्रपटांत काम करायचे होते. पण कुठलाही निमार्ता दिग्दर्शक त्यांना काम द्यायला तयार होईना. कारण प्रभू रामाची भूमिका साकारल्यानंतर अरूण गोविल यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली होती. ही प्रतिमा तोडण्यास कुणीही निर्माता तयार नव्हता. कुणीही त्यांना ग्लॅमरस भूमिका देऊ इच्छित नव्हता. याचमुळे गेल्या अनेक वर्षात अरूण गोविल कुठल्याही चित्रपट किंवा मालिकेत दिसले नाहीत. त्यांच्या वाट्याला आल्यात त्या केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिका.
एकंदर काय तर रामायण या मालिकेने अरूण गोविल यांना देशभरातील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले. पण याच मालिकेने त्यांच्या करिअरला मात्र कायमचा ब्रेक लावला.