"मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण...", 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 09:50 IST2024-12-01T09:50:22+5:302024-12-01T09:50:47+5:30
मधुराणीने 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून अरुंधतीचा संपूर्ण प्रवास दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मधुराणीने पोस्ट लिहिली आहे.

"मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण...", 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली?
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. अगदी कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. तर यातील कलाकारांना वेगळी ओळख मिळवून दिली. 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. आता 'आई कुठे काय करते' संपल्यानंतर मधुराणी भावुक झाली आहे.
मधुराणीने 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून अरुंधतीचा संपूर्ण प्रवास दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत मधुराणीने पोस्ट लिहिली आहे. "आई कुठे काय करतेचा प्रवास आज थांबला…. पण तो संपला नाही…कारण आई हे तत्व आहे, ते कसं संपेल? तो अनेक वर्षं असंख्य जणांच्या मनात घर करून राहणार आहे. मायबाप प्रेक्षकांचे आणि त्या विधात्याचे संपूर्ण टीम कडून मी पुन्हा एकदा आभार मानते….!!!", असं कॅप्शन मधुराणीने या पोस्टला दिलं आहे.
'आई कुठे काय करते' मालिका संपल्यानंतर मधुराणीने चाहत्यांसोबत इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे संवाददेखील साधला. यामधून तिने चाहत्यांचे आभार मानले. तसेच अरुंधतीला आणि या मालिकेला मिस करणार असल्याचंही मधुराणीने म्हटलं आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेच्या प्रवासाबाबतही तिने या व्हिडिओत सांगितलं. नवीन प्रोजेक्टमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही मधुराणीने सांगितलं आहे.
२३ डिसेंबर २०१९ रोजी 'आई कुठे काय करते' मालिकेचा पहिला एपिसोड प्रसारित करण्यात आला होता. या मालिकेतील देशमुख कुटुंब प्रेक्षकांना आपलंसं वाटायचं. अरुंधतीमध्ये प्रत्येक बाई स्वत:ला शोधत होती. या मालिकेने ५ वर्ष प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. आता मालिकेने निरोप घेतला असून त्या वेळेत 'आई आणि बाबा रिटायर्ड होत आहेत' ही मालिका सुरू होणार आहे.