'१५ वर्षातला जितका माझा अनुभव...'; वैशाली माढेनं सांगितलं संगीतातील प्रवासाबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 04:15 PM2023-07-31T16:15:45+5:302023-07-31T16:16:33+5:30
Sa Re Ga Ma Pa : गेली १७ वर्ष आणि तब्बल १५ यशस्वी पर्व आणि भरभरून प्रेम मिळालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘सा रे ग म प’. या मंचाने अनेक उत्तमोत्तम गायक महाराष्ट्राला आणि सिनेसृष्टीला दिले आहेत.
महाराष्ट्रातील नव्या दमाच्या गायकांना ओळख देण्याचं खरं काम जर कोणी केले असेल तर ते झी मराठी वरील ‘सारेगमपने’ (Sa Re Ga Ma Pa). गेली १७ वर्ष आणि तब्बल १५ यशस्वी पर्व आणि भरभरून प्रेम मिळालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘सा रे ग म प’. या मंचाने अनेक उत्तमोत्तम गायक महाराष्ट्राला आणि सिनेसृष्टीला दिले आहेत. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ ९ ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहायला मिळेल. या शोबद्दल वैशाली म्हणाली की, झी मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प हा असा शो आहे ज्या शोने महाराष्ट्राला पंचरत्न मिळवून दिले. सा रे ग म प चा मंच एक असा मंच आहे ज्याने अनेक गायक घडवलेत. या मंचावरचा माझा प्रवास सुद्धा एक स्पर्धक म्हणून झाला. अश्याच एका नवीन सिझन चा मी भाग होत आहे, मला खूप आनंद झाला आहे.
वैशाली पुढे म्हणाली की, ह्या पर्वातल्या छोट्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्याबद्दल सांगायचं झालं तर गेल्या १५ वर्षातला जितका माझा अनुभव आहे आणि माझ्यापरीने त्या मुलांना जितकं चांगलं मार्गदर्शन करता येईल ज्यामुळे त्यांच सादरीकरण सुधारेल याहून माझ्यासाठी आनंदाची गोष्ट दुसरी कुठलीही नसेल. कारण आता जरी मी परीक्षकाच्या भूमिकेत असले तरी याआधी मी एक स्पर्धक होते हे कधीच विसरणार नाही.
गायिका बनण्याची अशी मिळाली प्रेरणा
मी म्हणेन की मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे. माझ्या गाण्याने मला जन्माला घातलं आहे. माझ्यासाठी संगीत हे सर्वस्व आहे. वडिलांकडून गाण्याचा वारसा निश्चित मिळालेला आहे. पण जिद्द मेहनत आणि खूप कसोट्यांवर मात करून मी आज इथे पोचलेली आहे, आणि माझं जे संगीत आहे, जे जगणं आहे, त्या जगण्यातनं मला अनेकदा प्रेरणा मिळालेली आहे. आतापर्यंत माझा संघर्ष हीच माझ्या जगण्याची प्रेरणा राहिलेली आहे, असे तिने सांगितले.
सुरेश वाडकर आहेत माझे मार्गदर्शक
एक कलाकार म्हणून माझ्यावर प्रभाव टाकणारे सर्वात मोठे समर्थक किंवा मार्गदर्शक म्हणजे माझे गुरुजी सुरेश वाडकर जी. जे आता ह्या पर्वात गुरुजींच्या भूमिकेत असणार आहेत. सा रे ग म प जिंकल्यानंतर सुरेशजी हेच माझ्या सांगितला वळण देणारे एकमेव गुरू होते. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या गुरूंचे स्थान वेगवेगळे असतं, आपल्या जीवनात गुरूचे महत्त्व शब्दांत व्यक्त करता येत नाही. आई नंतर जर कोणी आपल्याला साचे शिकवणारे असेल तर तो आपला गुरू असतो. या संगीताच्या प्रवासात मला दृष्टी देणारे माझे गुरुजी ते आहेत सुरेशजी वाडकर, असेही वैशाली माढेने सांगितले.