अशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 11:39 AM2018-09-24T11:39:06+5:302018-09-24T11:41:04+5:30
आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या अशोक सराफ यांच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेली ४९ वर्षं सिनेप्रेमींचे मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४९ वर्षांची कामगिरी लक्षात घेता या सप्ताहाला ‘सम्राट सराफ’ हे नाव देण्यात आलं आहे.
अशोक सराफ यांचे चित्रपट २४ ते ३० सप्टेंबरच्या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. २४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी ३ वाजता अशोक सराफ यांचे ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घायाळ’, ‘आई नं.१’, ‘एकापेक्षा एक’, ‘गुलछडी’ हे चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहेत. पोलिसांच्या संवेदना दर्शवणाऱ्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
आजपर्यंत प्रेक्षकांसमोर एक तर पोलिसांची लाचखोरी किंवा त्यांचा जाच मांडला गेला आहे किंवा खूपच धीट अशा पोलिसांची कथा मांडली गेली आहे. मात्र पोलिसांनाही हृदय असतं... त्यातही संवेदना असतात... आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जसा सामान्य माणसांवर होतो, तसाच तो पोलिसांवरही होतो... समोरच्याचं दु:ख बघून सेंटी होणाऱ्या या पोलिसांची कथा ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून समीर पाटील या दिग्दर्शकाने मांडली आहे आणि मराठी प्रेक्षकांसाठी सुरू झालेल्या सोनी मराठी या नवीन वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे.
प्रेक्षकांशी अतूट नातं जोडण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या वाहिनीवर केल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरची सुरुवात गेली ४९ वर्षं प्रेक्षकांशी अनोखं नातं जपणाऱ्या अशोक सराफ यांच्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाने होणार आहे. या ४९ वर्षांत अशोक सराफ यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विनोदाचं अचूक मीटर जपणाऱ्या सराफ यांनी कित्येक संवाद अजरामर केले आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी संवादफेक करण्याची त्यांची शैली, आपल्या भूमिकेतलं वेगळेपण दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत सगळंच अभूतपूर्व...या सगळ्यांचाच परिणाम की काय, आजही दार ठोकल्यावर धनंजय मानेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, तर गंमतीने वॉख्खॅ, विख्खी, विख्खू हेही सहज येतं. केवळ विनोदच नाही तर अशोक यांनी साकारलेला खलनायकही तितकाच ताकदीचा होता.