अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत केले 'हे' वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 08:00 AM2019-03-25T08:00:00+5:302019-03-25T08:00:00+5:30
या आठवड्यात महाराष्ट्राचा महानायक अशोक सराफ आणि त्यांची सौभाग्यवती अभिनेत्री निवेदिता सराफ या मंचावर सज्ज होणार आहेत.
झी मराठी वाहिनीवरील संजय मोने यांच्या 'कानाला खडा' या चॅट शोची सर्वत्र चर्चा चालू आहे. या कार्यक्रमात संजय मोने कलाकारांशी गप्पा मारतात आणि त्यांच्या आयुष्यातील काही आठवणींना उजाळा देतात. तसंच कलाकारांच्या आयुष्यातील कानाला खडा लावणारे काही किस्से देखील या गप्पांमध्ये रंगतात. हा कार्यक्रम नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि नवनवीन व भन्नाट किस्स्यांमुळे रंगणाऱ्या या मैफिलीने तो अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस देखील पडला.
या आठवड्यात महाराष्ट्राचा महानायक अशोक सराफ आणि त्यांची सौभाग्यवती अभिनेत्री निवेदिता सराफ या मंचावर सज्ज होणार आहेत. अशोक सराफ यांनी त्यांच्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीत तमाम प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. संजय मोने यांच्यासोबत कानाला खडाच्या मंचावर अशोक मामांनी मनमुराद गप्पा मारल्या. सिलेब्रिटीपेक्षा ‘आर्टिस्ट’ म्हणून बोलावलेलं केव्हा हि आवडेल असं देखील अशोक सराफ यांनी सांगितलं. मराठी चित्रपटांमध्ये हिरो हा सामान्य दिसणारा असेल तरी चालतो हि गोष्ट जाणता अशोक सराफ यांनी या क्षेत्रात आपली कारकीर्द सुरु केली. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "मराठी चित्रपटात हिरोला चेहरा नाही हे मी जाणून आहे. आपल्याकडे मराठी चित्रपटाचा जो प्रेक्षकवर्ग आहे त्यांना कलाकार कसा दिसतो त्यापेक्षा तो काय करतो याला जास्त महत्व देतो. चांगलं काम केलंत तर तुम्ही हिरो अशी परिस्थिती जर नसती तर आम्हा लोकांना हिरो व्हायची संधीच नसती मिळाली. हिरोचा चेहरा नसूनही आम्ही चित्रपटसृष्टी गाजवली. मी आणि लक्ष्मीकांत बेर्डे आम्ही जवळ जवळ ५० चित्रपट एकत्र केले आणि प्रेक्षकांना चित्रपट पाहायला चित्रपटगृहाकडे खेचून आणलं हे मी अभिमानाने सांगू शकतो."