"मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकीनीत पाहायचं नाही", अश्विनीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, "सईचा चित्रपट आलेला तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 05:50 PM2023-10-28T17:50:14+5:302023-10-28T17:50:43+5:30
"मराठी कलाकारांना प्रेक्षक आपल्या घरातलं मानतात", अश्विनी महांगडे स्पष्टच बोलली
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. या मालिकेत राणू आक्का हे पात्र साकारून अश्विनी प्रसिद्धीझोतात आली. नाटकांत काम करून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या अश्विनीने मालिका आणि चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या. पण, तिची राणू आक्का ही भूमिका मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अश्विनीने करिअर, वैयक्तिक आयुष्य याबाबत भाष्य केलं.
या मुलाखतीत अश्विनीला बोल्ड भूमिका आणि मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घालण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'अजब गजब' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अश्विनीने यावर तिचं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, "स्वराज्यरक्षक संभाजी मालिका संपल्यानंतर मी वर्कआऊट करून बारीक झाले आणि नंतर वेस्टर्न कपड्यांमध्ये छान फोटोशूट केलं होतं. त्या फोटोंवर खूप कमेंट होत्या. अक्कासाहेब तुम्ही असं नका करू, तुम्हाला खूप कामं मिळतील. तुम्ही आहे तशाच छान दिसता. फोटो चांगला आहे. पण, आम्ही तुम्हाला अशा कपड्यांमध्ये नाही बघू शकत. अशा कमेंट त्या फोटोवर होत्या. त्या कमेंट वाचून मला वाटलं की नाही आपलं काहीतरी चुकतंय. कारण, स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे मी संपूर्ण महाराष्ट्राची बहीण झाले. त्या व्यक्तिरेखेने मला हे सगळं दिलं. मग माझ्यावर ही जबाबदारी आहे. एकतर त्यांच्या विरोधात जाऊन मी मला जे हवं ते करू शकते. पण, मला असं वाटतं की माझ्या भावाला जर वाटतंय की या पद्धतीची काम नको करूस, तर मी त्या पद्धतीची काम नाही करणार. बोल्ड भूमिका या फक्त कपड्यांमुळे ठरत नाहीत. पूर्ण कपडे घालूनही बोल्ड भूमिका करता येतात. तशी एखादी भूमिका आली तर मी निश्चितच करेन. पण कलाकार आणि माणूस म्हणून ही चौकट मी स्वत: घातली आहे."
"मराठी अभिनेत्रींना बिकिनी घातल्यामुळे त्या महाराष्ट्राच्या संस्कृती जपत नाहीत, असं प्रेक्षक म्हणतात. तुला खरंच असं वाटतं का?" असा प्रश्न अश्विनीला या मुलाखतीत विचारला गेला. ती म्हणाली, "ट्रोलर्सचं दुकानच वेगळं आहे. पण, आपल्या प्रेक्षकांचं कलाकारांवर प्रचंड प्रेम आहे. सई ताम्हणकरने नो एन्ट्री चित्रपटात बिकिनी घातली होती. माझा मित्र तो चित्रपट पाहायला गेला होता. तेव्हा पाचच तिकिटांचं बुकिंग झालं होतं. तर ते म्हणाले की आणखी लोक नाही आले तर आम्ही हा शो रद्द करू शकतो. याचाच अर्थ काय तर आपल्या मराठी प्रेक्षकांना आपल्या मुलींना बिकिनीत पाहायचं नाही. मग त्यात काय वाईट नाहीये. कारण, ते वेगळ्या लेव्हलचं प्रेम करतात. मराठी कलाकारांना ते आपल्या घरातलं मानतात."
पुढे ती म्हणाली, "शेवटी संविधानाने प्रत्येकाला कोणाला काय कपडे घालावं, काय घालू नये, याचा अधिकार आहे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना जसं हवं तसे कपडे ते घालत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करावं. प्रत्येक अभिनेत्रींना बिकिनी घातली म्हणून ट्रोल करू नये. देवाने ट्रोलर्सवर ही जबाबदारी दिलेली नाही."