मुग्धा-प्रथमेशच्या प्रेमाच्या कबुलीवर लाडका अवधूतदादा म्हणाला- "अरे व्वा, तुमचं..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 12:42 PM2023-06-16T12:42:12+5:302023-06-16T12:45:32+5:30
मॉनिटर अन् मोदकचं ठरलंय! काय म्हणाला लाडका अवधूत दादा?
'मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स' हा शो गाजला तो पंचरत्नांमुळे. रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैशंपायन हे शोमधून घराघरात पोहोचले. यातील दोन रत्नांनी नुकतंच 'आमचं ठरलंय' अशी कबुली दिली आहे. प्रथमेश लघाटे (Prathamesh Lagahte) आणि मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या प्रेमाची कबुली देत कालच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यावर लाडका अवधुत दादा कमेंट करणार नाही असं कसं होईल.
'मराठी सारेगमप लिटिल चॅम्प्स'मध्ये प्रथमेशला लाडाने मोदक आणि मुग्धाला मॉनिटर म्हणले जायचे. मोदक आणि मॉनिटरचं सूत जुळलंय याची शंका खरंतर सर्वांना आलीच होती. दोघांचे एकत्रित गायनाचे फोटो, व्हिडिओ, नयनरम्य परिसरात शूट केलेले गाण्याचे व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर खूप पसंत केले जायचे. चाहत्यांना तर तेव्हाच दोघांमध्ये काहीतरी आहे अशी शंका होती. 'मोदक गॉट मॉनिटर' असं म्हणत त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिलेला एक गोड फोटो शेअर केला. तुम्ही सगळेच आमच्याकडून ज्या कबुलीची वाट पाहत होता तर आम्ही सांगतो. होय आमचं ठरलंय, अशा कॅप्शनसह त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
दोघांच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये लिटिल चॅम्प्सचा लाडका अवधूत दादानेही कमेंट केली आहे. 'अरे व्वा! तुमचं दोघांचं खूप अभिनंदन' अशी कमेंट अवधूत गुप्तेने केली आहे.
याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने यांनीही त्यांच्या खास शैलीत कमेंट केली. त्या लिहितात,'कल्पना होतीच पण नक्की ना! काहीतरी गुगली नाही ना?' तर 'वाह बुआ!!वेलकम वहिनी' अशी कमेंट अभिनेत्री स्पृहा जोशीने केली आहे. प्रथमेश आणि मुग्धा दोघांवरही कलाकार आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय.