"तुम्हाला शॉर्टकट मिळतो पण...", रिअॅलिटी शोबाबत स्पष्टच बोलला अवधूत गुप्ते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 10:05 AM2024-04-25T10:05:25+5:302024-04-25T10:06:16+5:30
रिअॅलिटी शो करिअर घडवतात का? अवधूत गुप्तेने मांडलं स्पष्ट मत
अवधुत गुप्ते हा मराठीतील सुप्रसिद्ध गायक आहे. आजवर त्याने अनेक गाण्यांना आवाज देऊन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ऐका दाजिबा असो किंवा शिवसेना टायटल साँग...सिनेमातील गाण्यांपासून ते राजकीय पक्षांच्या गाण्यापर्यंत अवधूतची गाणी हिट ठरली. रिएलिटी शोचा स्पर्धक ते परिक्षक असा यशस्वी प्रवास करणाऱ्या अवधूतने या शोची खरी बाजू सांगितली आहे.
अवधूत गुप्तेने नुकतीच मित्र म्हणे पॉडकास्टला हजेरी लावली. या मुलाखतीत त्याने रिएलिटी शो आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या स्पर्धकांचं करिअर याबाबत भाष्य केलं. तो म्हणाला, "एखाद्या गायकाने रिएलिटी शो जिंकल्यानंतर त्याला शॉर्टकट मिळतो. म्हणजे समजा ५ किमीचा रस्ता असेल तर ते अंतर कमी होऊन १ किमीचा होतो. पण, शेवटी तो तिथेच पोहोचणार आहे ज्यासाठी तो पात्र आहे. त्याला जे मिळणार आहे, त्यात तुम्ही काहीच बदल करू शकत नाही. सुनिधी चौहान, अरिजित सिंग, स्वप्निल बांदोडकर ते अवधूत गुप्तेपर्यंत...हे लोक जर रिएलिटी शोमध्ये गेले नसते तर इथपर्यंत पोहोचले नसते का? मला वाटतं ते १०० टक्के इथे पोहोचले असते. पण, कदाचित थोडा जास्त वेळ लागला असता."
"सूर नवा ध्यास नवामध्ये आलेले काही गायक खूप पुढे गेले. काही मध्यावर अडखळले...काहींना शक्य झालं नसेल. पण, या सगळ्यात त्यांचा प्रवास थोडा सुखकर आणि सोपा करण्यासाठी त्या मंचाचा, एकविरा प्रोडक्शन आणि कलर्स मराठीचा ५ टक्के वाटा आहे. पण, म्हणून आम्ही त्यांचं करिअर घडवलं, भाग्य घडवलं असं म्हणता येणार नाही. आम्ही मंचावर फक्त चांगला गायक शोधून काढतो. तो जिंकून बाहेर गेल्यानंतर तो प्रोफेशनली यशस्वी होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आजच्या जगात फक्त चांगला गायक असणं महत्त्वाचं नाही. पीआर, सोशल मीडिया, ब्रँडिंग, टेक्नोलॉजी या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत," असं म्हणत अवधूतने त्याचं स्पष्ट मत मांडलं.