बालिका वधूच्या दोन्ही मुख्य कलाकारांचे कमी वयातच निधन, प्रत्युषाचा मृत्यू आजही रहस्यच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 01:49 PM2021-09-02T13:49:30+5:302021-09-02T13:58:53+5:30
प्रत्युषा बॅनर्जीच्या निधनाने सिद्धार्थ शुक्लालाही मोठा धक्का बसला होता. प्रत्युषाच्या आठवणीत अनेकदा सिद्धार्थ भावूक व्हायचा.
'बालिका वधू' मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेल्या सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराने निधन झालंय. सिध्दार्थच्या अकाली एक्झिटने सारेच हळहळले आहेत. सिद्धार्थच्या निधन झाल्याची बातमी आली अन् अवघी इंडस्ट्रीच शोकसागरात बुडाली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाल्याचे कोणाला विश्वास बसत नाहीय.
'बालिका वधू' मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे रसिकांचीही आवडती मालिका बनली होती. छोटी आनंदी अविका गौर आणि जग्याच्या भूमिकेत अविनाश मुखर्जी यांनी भूमिका साकारली होती. मालिकेत लिप पिरयड आला आणि मोठ्या आनंदीच्या रुपात प्रत्युषा बॅनर्जी झळकली तर मोठ्या जग्याच्या रुपात अभिनेता शशांक व्यास झळकला होता.
मालिकेत सिद्धार्थ शुल्काचीही एंट्री झाली होती. शिवराज आलोक शेखरच्या भूमिकेत तो झळकला होता. या दोघांची जोडी रसिकांच्याही पसंतीस उतरली होती. सिद्धार्थ याच मालिकेतून प्रकाशझोतात आला होता. त्याच्या भूमिकेला प्रचंड पसंती मिळाली होती. सिद्धार्थ घराघरात प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. टीव्ही मालिका आणि रुपेरी पडदा त्याने गाजवला.
प्रत्युषा आणि सिद्धार्थ दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही दोघांची खूप चांगली गट्टी जमायची. प्रत्युषाच्या निधनाने सिद्धार्थलाही मोठा धक्का बसला होता. प्रत्युषाच्या आठवणीत अनेकदा सिद्धार्थ भावूक व्हायचा. सोशल मीडियावरही तो प्रत्युषाची आठवण काढताना दिसायचा. प्रत्युषाच्या वाढदिवसाच्या दिवशी तो तिच्या आठवणी चाहत्यासंह शेअर करायचा.
२०१६ मध्ये प्रत्युषा बॅनर्जीचे वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षीच निधन झाले होते. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच आत्महत्येचं पाऊल उचलत प्रत्युषाने आयुष्य संपवलं. प्रत्युषाच्या निधनाला पाच वर्षांचा काळ उलटला असला तरीही तिच्या मृत्यूचं गुढ उकलू शकलेलं नाही, प्रत्युषाने आत्महत्या केली यावर आजही कुटुंबाचा विश्वास बसत नाही. प्रत्युषाची हत्या करण्यात आल्याचा कुटुंबियांनी दावा केला होता.