Band Baja Varat : आमचं लग्न टिपिकल नव्हतं..., रेणुका शहाणे यांनी सांगितला आहेराचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:15 PM2022-03-11T12:15:03+5:302022-03-11T12:19:14+5:30
Band Baja Varat : ‘लो चली मैं अपनी देवर की बारात लेके’ फेम रेणुका शहाणे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहेत. ‘बँड बाजा वरात’ हा नवा कोरा शो त्या होस्ट करताना दिसणार आहेत.
झी मराठीवर ‘बँड बाजा वरात’ (Band Baja Varat ) हा नवा कोरा शो येतोय. तुम्हीही या शोची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम आशु अर्थात पुष्कराज चिरपुटकर याच्यासोबत ‘लो चली मैं अपनी देवर की बारात लेके’ फेम रेणुका शहाणे (Renuka Shahane ) या सुद्धा या शोच्या होस्ट म्हणून दिसणार आहेत.
येत्या 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या या शोचा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला. यात पुष्कराज आणि रेणुका शहाणे दोघंही दिसत आहेत.
या शोच्या निमित्ताने रेणुका यांनी आपल्या लग्नाचा एक किस्साही चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
‘peepingmoon’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाची आठवण सांगितली. लग्नाच्या आहेरात मिळालेली कोणती अशी वस्तू आहे जी आजही तुम्ही जपून ठेवली आहे? असा प्रश्न रेणुका यांना विचारण्यात आला.
यावर त्या म्हणाल्या, ‘माझं व आशुतोषचं (आशुतोष राणा ) लग्न टिपिकल लग्न नव्हतं. आम्ही मंदिरात लग्न केलं होतं. आमच्या लग्नात खूप लोकं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. पण आम्ही आहेर स्वीकारला नव्हता. माझ्या सासरकडून माझे मोठे दीर यांनी मात्र माझ्या स्वागतासाठी एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र मी अजूनही जपून ठेवलं आहे. ते पत्र हाच माझ्यासाठी अमूल्य आहेर आहे.’
अशी झाली होती पहिली भेट
रेणुका शहाणे व आशुतोष राणा हे बॉलिवूडचं एक क्यूट कपल. रेणुका शहाणे व आशुतोष राणा यांची भेट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या एका चित्रपटादरम्यान झाली होती. गायिका राजेश्वरी सचदेव हिच्या माध्यमातून दोघंही एकमेकांना भेटले होते. आशुतोष यांच्यासोबत लग्न करण्याच्या निर्णय घेताना रेणुका थोड्या द्विधामन:स्थितीत होत्या. पण आशुतोष मात्र लग्नाच्या निर्णयावर ठाम होते.. पहिल्या भेटीनंतर सुमारे अडीच वर्षानंतर दोघांनीही लग्न केलं. दोघांनाही दोन मुलं आहेत. आशुतोष हे मुळचेमध्यप्रदेशचे आहेत. मध्यप्रदेश मधील त्यांच्या गावात त्यांचं लग्न झालं. रेणुका लग्नासाठी ट्रेनने गावात पोहोचल्या. त्यावेळी स्टेशनवर त्यांना घ्यायला किमान दीड हजार लोक आले होते. त्यांच्या लग्नाला तर इतकी गर्दी होती की, या गर्दीमुळे रेणुकांचे आई वडील लग्नाच्या ठिकाणापर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी नणंदेने रेणुकांचे कन्यादान केले होतं.
रेणुका शहाणे यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमात काम केलं आहे. ‘हम आपके हैं कौन’ या सिनेमातील रेणुका यांनी साकारलेली भूमिका रसिकांना प्रचंड भावली. सुरभी या छोट्या पडद्यावरील शोमधूनही त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. रेणुका शहाणे एक उत्तम दिग्दर्शकाही आहेत.