'या' गोष्टीमुळे अभिजीत खांडकेकरने सतत चांगले काम करण्याचा निर्धार केला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 08:00 AM2019-01-05T08:00:00+5:302019-01-05T08:00:00+5:30
नुकताच अभिजीत 'कानाला खडा' या कार्यक्रमात येऊन गेला आणि यावेळी त्यांने सर्वांना एक किस्सा शेअर केला.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेमुळे अभिजीत खांडकेकर घराघरात पोहोचला. नुकताच अभिजीत 'कानाला खडा' या कार्यक्रमात आला होता आणि यावेळी त्यांने सर्वांना एक किस्सा शेअर केला. तो किस्सा सांगताना अभिजीत म्हणाला, "मला काही महिन्यांपूर्वी अन्नोन नंबरवरून एका महिला मानसोपचारतज्ञाचा कॉल आला ज्या डिप्रेशनमध्ये असलेल्या मुलांना डिप्रेशनमधून मुक्त करण्यासाठी काम करणाऱ्या एका एन.जी.ओ. सोबत असोसिएटेड आहेत. त्यांनी मला त्यांच्या एका पेशंटसोबत २ मिनिट बोलण्याची विनंती केली. मी त्या मुलीशी बोललो आणि या घटनेला १ ते दीड महिना उलटून गेला. त्यानंतर त्या बाईंचा पुन्हा मला कॉल आला आणि त्यांनी माझे खूप आभार मानले कारण ज्या मुलीशी मी फोनवर बोललो होतो ती एक कॅन्सर पेशंट होती आणि तिला डिप्रेशन देखील आलं होतं. ती कुठल्याही उपचाराला किंवा औषधांना प्रतिसाद नव्हती देत. पण त्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली कि ती माझी मालिका आवर्जून बघायची आणि माझ्याबद्दल भरभरून बोलायची त्यामुळे त्यांनी मला भेटायचं आणि माझ्याशी बोलायचं आमिष दाखवून तिच्यावर उपचार केले आणि ती मुलगी आता कॅन्सर आणि डिप्रेशन यातून पूर्णपणे बरी झाली असून तिला आता जगण्याची नवीन उमेद मिळाली असल्याचं त्यांनी मला सांगितलं आणि त्यात माझं खूप मोलाचं योगदान होतं असं ही त्या म्हणाल्या. तेव्हापासून मी सतत चांगलं काम करण्याचा निर्धार केला, कारण आपल्या कामाने कधी कोणाला कसा फरक पडू शकतो याची आपल्याला कल्पना देखील नसते." .