१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून झाली वेगळी; आता अध्यात्माच्या मार्गावर आहे मराठमोळी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 10:41 IST2024-02-09T10:39:56+5:302024-02-09T10:41:38+5:30
पतीपासून वेगळं होत मराठमोळ्या अभिनेत्रीने स्वीकाराला अध्यात्माचा मार्ग, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

१९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून झाली वेगळी; आता अध्यात्माच्या मार्गावर आहे मराठमोळी अभिनेत्री
'भाभीजी घर पर है' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शुभांगी अत्रे. या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. अभिनयाबरोबरच शुभांगी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लाइमलाइटमध्ये असते. गेल्याच वर्षी शुभांगीने पती पियुषपासून वेगळं झाल्याचं सांगितलं होतं. १९ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता शुभांगीने अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे.
शुभांगी अत्रे गेल्या काही दिवसांपासून एकांतात वेळ घालवत आहे. कोयंबटूरमधील योग आणि अध्यात्मिक आश्रमात ती काही दिवस होती. याचे काही व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. "योग केंद्रात एक दिवस घालवल्यानंतरही खूप शांतता मिळते. आश्रम एक शांत जागा आहे. जिथे मला ध्यानसाधना, योग करण्यात आनंद मिळाला," असं तिने म्हटलं आहे. पुढे ती म्हणते, "अध्यामिक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा यामुळे मी प्रभावित झाले आहे. तिथे घालवलेल्या क्षणांमुळे मी स्वत:चं आत्मपरिक्षण करू शकले."
शुभांगी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'कस्तुरी', 'दो हंसो का जोडा', 'कुमकुम', 'कर्म अपना अपना' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ती विविधांगी भूमिकेत दिसली. पण, 'भाभीजी घर पर है' मालिकेतून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शुभांगीने पियुष पुरेशी २००३ साली लग्न केलं होतं. मुलीसाठी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतल्याचं शुभांगीने सांगितलं होतं. पण, आता ते एकत्र राहत नाहीत.