Shubhangi Atre : 'तो' एक फोन कॉल अन् 'भाभी जी घर पर हैं' फेम अभिनेत्रीचं अकाऊंट झालं रिकामं; 'असा' घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 12:42 PM2022-09-12T12:42:27+5:302022-09-12T12:53:24+5:30
Bhabi Ji Ghar Par Hai Shubhangi Atre : अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्री ऑनलाईन फसवणुकीची शिकार झाली आहे.
'भाभी जी घर पर हैं' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अंगुरी भाभी अर्थात अभिनेत्री शुभांगी अत्रेसोबत (Bhabi Ji Ghar Par Hai Shubhangi Atre) एक धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्री ऑनलाईन फसवणुकीची शिकार झाली आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शुभांगीने दिलेल्या माहितीनुसार, ती ऑनलाइन शॉपिंग करत होती आणि त्याच दरम्यान तिची फसवणूक करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडले जाईल, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली. त्याचप्रमामे सतर्क राहण्याचे आवाहनही शुभांगीने केले.
टाइम्स ऑफ इंडियाशी संवाद साधताना शुभांगीने "8 सप्टेंबर 2022 रोजी मी एका अतिशय विश्वासार्ह फॅशन वेबसाइटवरून खरेदी करत होती. मी गेल्या 3 वर्षांपासून हे फॅशन एप वापरते. त्यामुळे माझ्यासोबत काहीतरी चुकीचे घडू शकते याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी त्या दिवशी काही गोष्टी ऑर्डर केल्या. यानंतर मला समोरुन फोन आला. समोरच्या माणसाने माझ्या घराचा पत्ता सांगितला आणि ऑर्डर क्रमांकाचा तपशील सांगितला. घराचा पत्ता आणि ऑर्डर नंबर ऐकून मला कॉलबद्दल बऱ्यापैकी खात्री झाली. कारण हे सर्व तपशील फॅशन कंपनीकडेच उपलब्ध होते" असं म्हटलं आहे.
"माझ्या खात्यातून लागोपाठ ट्रान्झॅक्शन झाले आणि पैसे गेले"
"सर्वात आधी माझ्याशी दोन महिलांनी फोनद्वारे संवाद साधला. यानंतर दोन मुलांशी बोलणे झाले. त्यांनी मला सांगितले की मी त्यांची प्रीमियर मेंबर आहे, त्यामुळेच ते कंपनीकडून गिफ्टही देणार आहेत. अनेकदा मी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते. कारण मला अनेकदा अशा भेटवस्तू आणि उत्पादनांचे फोन येतात. पण त्यांनी अशाप्रकारे संवाद साधला की मला वाटले की ते खूप विश्वासार्ह आहेत. म्हणूनच मी त्यांनी दिलेल्या पर्यायांमधून उत्पादन निवडण्याचा निर्णय घेतला. ही भेट पूर्णपणे मोफत असेल, फक्त मला जीएसटी भरावा लागेल असं सांगितलं. मी माझ्या फोनवरून हे पेमेंट करताच, माझ्या खात्यातून लागोपाठ ट्रान्झॅक्शन झाले आणि माझ्या बँक खात्यातून पैसे गेले."
"सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे"
"हे सर्व पाहताच मला समजले की माझ्यासोबत फसवणूक झाली आहे, म्हणून मी लगेच माझे कार्ड ब्लॉक केले. माझ्यासोबत अशी घटना घडेल असे कधीच वाटले नव्हते. कारण मी सहसा या सर्व गोष्टी खूप जाणीवपूर्वकरित्या करते. अनेकदा आपल्याला सांगितले जाते की, तुमचा OTP कोणाशीही शेअर करू नका किंवा कोणतीही असामान्य लिंक क्लिक करू नका. मीही असे काही केले नाही. मी सर्व चाहत्यांना हे सांगू इच्छिते की ऑनलाइन फसवणूक करणारे नवीन युक्त्या वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे" असंही शुभांगी यांनी सांगितलं.
"माझा कष्टाचा पैसा होता जो कोणी चुकीच्या मार्गाने वापरू नये"
सध्या शुभांगीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिने सांगितले की तिला पोलीस विभागाकडून समजले की कशाप्रकारे नवीन मार्गांचा अवलंब करून हे गुन्हेगार लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. शुभांगीने हे कुणाबाबतही घडू नये अशी अपेक्षा व्यक्त केला आहे. अभिनेत्रीच्या खात्यातून मोठी रक्कम चोरीला गेल्याची माहिती मिळते आहे. अभिनेत्रीने पैसे गेल्याची खंत व्यक्त करत हा माझा कष्टाचा पैसा होता जो कोणी चुकीच्या मार्गाने वापरू नये असे मला वाटतं असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.