भाभीजी घर पर हैं: लिंबूपाणी पिऊन 'या' अभिनेत्रीने भरलं पोट; बॉडी शेमिंगचाही केलाय सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:07 PM2022-05-12T18:07:50+5:302022-05-12T18:08:37+5:30
Soma rathod: सुरुवातीच्या काळात सोमा राठोड यांच्याकडे एक वेळच्या जेवणाचेही पैसे नसायचे. त्यामुळे अनेकदा त्या केवळ लिंबू पाणी पिऊन दिवस काढत होत्या.
गेल्या कित्येक वर्षांपासून 'भाभीजी घर पर हैं' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका टीआरपीमध्ये प्रथम स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. या मालिकेच्या उत्तम कथानकासह त्यातील कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. यातील अंगुरी भाभी, अनिता भाभी या भूमिका विशेष लोकप्रिय आहे. परंतु, त्यांच्यासोबतच आणखी एक लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे अम्माजी. ही भूमिका अभिनेत्री सोमा राठोड साकारत असून एकेकाळी त्यांनी प्रचंड हालाखीचे दिवस जगले आहेत.
अम्माजी ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सोमा राठोड. आज सोमा या अम्माजी याच नावाने सर्वत्र ओळखल्या जातात. उत्तम अभिनयाच्या जोरावर यश, संपत्ती कमावणाऱ्या सोमा यांनी एकेकाळी चक्क लिंबू पाणी पिऊन दिवस काढले आहेत.
सुरुवातीच्या काळात सोमा राठोड यांच्याकडे एक वेळच्या जेवणाचेही पैसे नसायचे. त्यामुळे अनेकदा त्या केवळ लिंबू पाणी पिऊन दिवस काढत होत्या. एका मुलाखतीत त्यांनी स्ट्रगल काळात दिलेल्या ऑडिशनचा किस्सा सांगितला.
"मी लोकल ट्रेनने बोरिवली ते अंधेरी असा प्रवास करायचे. त्यावेळी लिंबू पाणी ३ रुपयांना मिळायचं. खिशात पैसे कमी असल्यामुळे मला दिवसभर ऑडिशन, फोटोशूट मिटिंग या सगळ्या गोष्टी केवळ एका लिंबू पाण्यावरच कराव्या लागत होत्या. सकाळी एकदा लिंबू पाणी प्यायल्यानंतर दिवसभर त्यावरच मी फिरायचे. मग संध्याकाळी घरी येताना एकदा हे सरबत प्यायचे त्यानंतर घरी आल्यावर मग जेवायचे", असं सोमा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "स्ट्रगल काळात मला बॉडी शेमिंगचाही सामना करावा लागला. अनेकजण माझ्या वजनावरुन मला ट्रोल करायचे. त्यामुळे शेवटी मी माझ्या शरीराकडे पाहून कॉमेडी टीव्ही सिरिअल्समध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला काही मालिका मिळू लागल्या."
दरम्यान, सोमा यांनी जीजाजी छत पर हैं, लापतागंज यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. आज त्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.