भाग्यश्री - दुष्यंत यांची जगावेगळी प्रेमकथा 'सोन्याची पावलं'मध्ये, नवीन मालिका लवकरच भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 10:58 AM2021-06-29T10:58:36+5:302021-06-29T10:59:16+5:30
सोन्याची पावलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत भाग्यश्रीची गोष्ट रेखाटण्यात आली आहे.
छोट्या पडद्यावर लवकरच सोन्याची पावलं ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत भाग्यश्रीची गोष्ट रेखाटण्यात आली आहे. या कथेची निर्मिती ‘पर्पल मॉर्निंग मुव्हीज’ने केली आहे. ही मालिका ५ जुलैपासून संध्याकाळी साडेसहा वाजता कलर्स मराठीवर प्रसारीत होणार आहे.
एका छोट्या गावामध्ये मध्यम वर्गीय घरात वाढलेली भाग्यश्री ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि मेहनती मुलगी आहे. इतरांना आनंद कसा देता येईल याच प्रयत्नात ती असते. ‘आपण आपलं काम करत राहावं, एक ना एक दिवस देव त्याचं फळ देईल’ हे भाग्यश्रीच्या जगण्याचे सूत्र आहे. भाग्यश्री दहा वर्षांची असताना तिची आई देवा घरी गेली आणि वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईच्या जाचाला कंटाळलेल्या भाग्यश्रीला आता यातून सुटकेचा एकमेव मार्ग दिसतो आहे आणि तो म्हणजे लग्न. तर, दुसरीकडे इनामदार घराण्याचे शेंडेफळ दुष्यंत इनामदार. अत्यंत देखणा, धडाडीचा, इतरांना सल्ले देणारा, मित्रांच्या मदतीला एका हाकेवर धावणारा, लोकांना मदत करणारा. याच सवयीमुळे त्याची भाग्यश्रीशी ओळख होते आणि अपघाताने भाग्यश्री - दुष्यंतचं लग्न होतं. नियतीमुळेच दोन वेगळी विश्व असलेले भाग्यश्री आणि दुष्यंत एकत्र येतात. एकमेकांचे जोडीदार बनून ते एक नवं विश्व निर्माण करतील ? इनामदारांच्या घराची सून ते गावाची वाहिनीसाहेब होण्यापर्यंतचा भाग्यश्रीचा हा प्रवास कसा असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
मालिकेच्या निर्मात्या श्रावणी देवधर म्हणाल्या, “आपण सगळेच जवळपास दीड वर्षापासून अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देतो आहे. पण मनोरंजनसृष्टी काही थांबलेली नाही. ‘सोन्याची पावलं’ या नवीन मालिकेसाठी आमची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहे. ही मालिका माझ्या विशेष जवळची आहे. या मालिकेनिमित्त माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट घडते आहे, माझी लेक सई देखील या मालिकेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. याआधी बरेचसे प्रोजेक्टस प्रोड्यूस केले, पण मालिका करण्याची ही आमची पहिलीच वेळ आहे. ”.
भाग्यश्री - दुष्यंत यांची जगावेगळी प्रेमकथा ‘सोन्याची पावलं’ ५ जुलैपासून सोम. ते शनि. संध्या. ६.३० वा.कलर्स मराठीवर पहायला मिळेल.