भाविका शर्माने स्वीकारले हे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 03:22 PM2018-06-28T15:22:25+5:302018-06-28T15:40:28+5:30
'जीजी माँ' मालिकेत नियती पुरोहित या नायिकेची भूमिका रंगविणारी अभिनेत्री भाविका शर्मा हिलाही अलीकडे अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. भाविकाला पाण्याची भीती वाटते.
टीव्हीच्या पडद्यावर सफाईदार अभिनय पाहताना असा अभिनय करण्यासाठी संबंधित कलाकाराला किती अडचणींना तोंड द्यावे लागले असेल, याची कल्पना प्रेक्षकांना कधीच येत नाही. पटकथेच्या मागणीमुळे या कलाकारांना कधी कधी काही थरारक, स्टंट प्रसंग साकारावे लागतात, जे त्यांनी त्यापूर्वी कधीच केले नसतात किंवा तशा प्रसंगांची त्यांना सवयही नसते. ‘स्टार भारत’वरील ‘जीजी माँ’ मालिकेत नियती पुरोहित या नायिकेची भूमिका रंगविणारी अभिनेत्री भाविका शर्मा हिलाही अलीकडे अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. भाविकाला पाण्याची भीती वाटते. परंतु मालिकेतील एका प्रसंगात तिला पाण्याखाली काही काळ श्वास रोधून राहावे लागले होते.
मालिकेच्या सध्याच्या कथानकानुसार, फाल्गुनीवर (तन्वी डोग्रा) सूड उगविण्याचा प्रयत्न करणारी उत्तरादेवी (पल्लवी प्रधान) नियतीला (भाविका शर्मा) एका पाण्याच्या टाकीत बंद करून टाकते. तिला वाचविण्यासाठी फाल्गुनीला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागणार असते. या प्रसंगासाठी भाविकाला पाण्याच्या टाकीत तब्बल चार तास राहावे लागणार होते. परंतु भाविकाला पाण्याची जबरदस्त भीती वाटते आणि ती कधी पाण्यात उतरत नाही. त्यामुळे हा प्रसंग साकार करण्यासाठी तिला बराच काळ समजावून सांगावे लागले आणि तिची मानसिक तयारी करावी लागली. पाण्याच्या टाकीत पाण्याची पातळी वाढू लागली, तशी तिला आपला श्वास रोधून धरावा लागला होता. या साऱ्या प्रसंगाचे चित्रीकरण पार पडल्यावर भाविका थंडीने पूर्ण गारठून गेली होती आणि शरीरात ऊब निर्माण करण्यासाठी तिने पाच कप गरमागरम कॉफी प्यायली. पाण्याच्या टाकीत पाण्याखाली राहण्याच्या आपल्या अनुभवाचे कथन करताना भाविका म्हणाली, “मला पोहता येत नाही आणि त्यामुळे मी पाण्यात बुडून जाईन, अशी भीती माझ्या मनात सतत असते. त्यामुळेच या मालिकेत पाण्याखाली राहण्याचा प्रसंग साकार करणं हा माझ्या कारकीर्दीतील सर्वात धोकादायक आणि धाडसी प्रसंग होता. पण मला तो यशस्वीपणे साकार करता आला, याचं सारं श्रेय मी माझे दिग्दर्शक रोहितसर यांना देते. त्यांनीच माझ्या मनाची समजूत घातली आणि मला हा प्रसंग साकारण्यास मनाने तयार केलं. ती पाण्याची टाकी पूर्ण भरलेली असल्याने मला तिथे गुदमरल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे पाण्याखाली श्वास रोधून धरणं हे माझ्यासाठी मोठं आव्हान होतं. पण मला वाटणाऱ्या भीतीला मी थेट सामोरी गेले, याचा मला आनंद वाटतो.”