Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये यंदा दिसणार ‘हे’ लोकप्रिय चेहरे? ‘या’ एका नावाचीही होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 10:30 AM2022-09-12T10:30:25+5:302022-09-12T10:39:50+5:30
Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, हे जाणून घेण्याची ओढही प्रेक्षकांना लागली आहे. सध्या दोन मोठ्या नावांची जोरदार चर्चा रंगलीये. पहिलं नाव म्हणजे, ‘तुझ्यात जीव रंंगला’चा राणादा अर्थात हार्दिक जोशी. दुसरं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो...
छोट्या पडद्यावरचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन (Bigg Boss Marathi 4) येणार येणार, अशी अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता ही प्रतीक्षा संपली आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस मराठी 4’ सुरू होतोय. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरातील नवनवीन टास्क, रोज रंगणारे राडे, वाद असं सगळं पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. शिवाय यंदाच्या सीझनमध्ये कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, हे जाणून घेण्याची ओढही प्रेक्षकांना लागली आहे.
सध्या दोन मोठ्या नावांची जोरदार चर्चा रंगलीये. होय, पहिलं नाव म्हणजे, ‘तुझ्यात जीव रंंगला’चा राणादा अर्थात हार्दिक जोशी (Hardeek Joshi). दुसरं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. हे नाव कुणाचं तर ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांचं. किरण माने ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये जाणार, अशी चर्चा जोरात सुरू झाली आहे.
‘बिग बॉस मराठी 4’च्या संभाव्य स्पर्धकांची यादी व्हायरल झाली आहे. यात दुसऱ्या क्रमांकावर किरण माने यांचं नाव आहे. बिग बॉस खबरी नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर ही यादी शेअर करण्यात आली आहे. किरण माने यांना या शोसाठी विचारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप शोच्या मेकर्सनी वा किरण माने यांनी याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. पण ते या शोमध्ये सहभागी होणार, अशी चर्चा जोरात आहे.
काही महिन्यांआधी किरण माने अचानक चर्चेत आले होते. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून त्यांना अचानक काढून टाकण्यात आले होते. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप यानंतर किरण माने यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर अनेकजण त्यांच्या बाजूने मैदानात उतरले होते. तथापि स्टार प्रवाह वाहिनीने किरण माने प्रकरणी लेखी स्पष्टीकरण दिलं होतं. राजकीय भूमिका मांडत असल्यामुळे नव्हे तर अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषत: महिला कलाकारांसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं वाहिनीने स्पष्ट केलं होतं.
किरण माने हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियावर ते बेधडक पोस्ट शेअर करत असतात. यामुळे ते अनेकदा ट्रोलही होतात.
या नावांचीही चर्चा
बिग बॉस खबरीने शेअर केलेल्या यादीनुसार, मराठीतील अनेक लोकप्रिय चेहरे यंदाच्या ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. यात हार्दिक जोशी, किरण माने यांच्याशिवाय प्राजक्ता गायकवाड, शुभांगी गोखले, नेहा खान, अलका कुबल, सोनल पवार, रूचिरा जाधव, शर्वरी लोहकरे, ओमप्रकाश शिंदे, दीप्ती लेले, अनिकेत विश्वासराव, निखील चव्हाण, यशोमन आपटे, अण्णा अर्थात माधव अभ्यंकर, कार्तिकी गायकवाड यांच्या नावांची चर्चा आहे. आता या यादीत किती तथ्य आहे, ते लवकर कळेलच.