Big Boss Marathi : ‘बिग बॉस’च्या घरात रंगली खरीखुरी पत्रपरिषद!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 09:52 PM2018-07-18T21:52:44+5:302018-07-19T08:23:16+5:30
बिग बॉस मराठी या रिऍलिटी शोच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.
बिग बॉस या रिऍलिटी शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. अस्ताद काळे आणि पुष्कर जोगने या कार्यक्रमाच्या फायनल पर्यंत धडक मारली आहे. आता या कार्यक्रमाचा विजेता कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमाच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामुळे या घरात जाण्याची संधी मिळाली. हे घर लोणावळ्याला असून या शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागात या कार्यक्रमाचा सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर जायची मला नुकतीच संधी मिळाली. या स्टुडिओचा गेट हा साधा पत्र्याचा आहे. तो पाहून आत इतका मोठा सेट असेल असे आपल्याला थोडे देखील वाटत नाही. पण आतमध्ये गेल्यावर छान हिरवळ आपले लक्ष वेधून घेते. त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रोडक्शनची छोटी मोठी ऑफिसेस आपल्याला दिसतात. थोडे आत गेले की या घराचा भला मोठा सेट बांधलेला आहे. याच घराच्या एका भागात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, पुष्कर जोग, मेधा घाडे, अस्ताद काळे आणि स्मिता गोंदकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना भरभरून उत्तरे दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ही सगळी मंडळी या घरात असल्याने त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नाहीये. त्यामुळे सगळ्या पत्रकारांना भेटून स्पर्धकांना खूप आनंद झाला होता. एवढया दिवसांनी इतके लोक पाहायला मिळाले, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या अशाच सगळ्या स्पर्धकांच्या प्रतिक्रिया होत्या.
हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक स्पर्धकांमध्ये वाद रंगले. पण तरीही सगळे जण आपले वाद विसरून फायनलला सामोरे जात आहेत. घरातून बाहेर पडल्यावर देखील एकमेकांना भेटायचे असे सगळ्यांनी ठरवले आहे. तसेच बाहेर पडल्यावर प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे. अस्ताद काळेच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असल्याचे त्याने या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी मान्य केले होते. त्याला या घरातून बाहेर पडल्यावर त्याच्या या खास मैत्रिणीला म्हणजेच अभिनेत्री स्वप्नाली पाटीलला भेटायचे आहे असे त्याने सांगितले तर स्मिताला तिच्या आईला भेटायचे आहे. मेघाला तिच्या कुटुंबियांना भेटायची ओढ लागली आहे तर शर्मिष्ठाला तिचे वडील आणि तिची लाडकी मैत्रीण मधुगंधा कुलकर्णी यांना भेटायचे आहे. पुष्करला मुलीला भेटायचे असून बायकोला आलिंगन द्यायचे आहे. सईला देखील पालकांना भेटण्याची तीव्र इच्छा आहे.
बिग बॉस या कार्यक्रमात गेल्यापासून प्रत्येक स्पर्धक जिंकण्यासाठी मेहनत घेत आहे. या कार्यक्रमाचा अंतिम भाग आता काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या स्पर्धकांच्या फॅन्सनी अधिकाधिक मते देऊन आपल्याला विजेता बनवावे असे प्रत्येक स्पर्धकाला वाटत आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाने पत्रकारांच्या माध्यमातून आजवर न मांडू शकलेल्या अनेक गोष्टी लोकांसमोर मांडल्या.
सगळ्या स्पर्धकांशी कित्येक तास गप्पा मारून आम्ही पत्रकारांनी स्पर्धकांचा निरोप घेतला. ही पत्रकार परिषद संपूच नये आणि हा गप्पांचा फड असाच सुरू राहावा असेच भाव प्रत्येक स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आम्हाला निरोप देताना दिसत होते.