'बिग बॉस १३' फेम हिंदुस्थानी भाऊ आता दाखवणार अभिनय कौशल्य, दिसणार वेबसीरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 05:27 PM2021-01-12T17:27:46+5:302021-01-12T17:28:33+5:30
बिग बॉसचा १३ फेम हिंदुस्थानी भाऊ वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतो.
बिग बॉसच्या तेराव्या सीझनमधील स्पर्धक हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वीच हिंदुस्थानी भाऊने एकता कपूर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. एकता कपूरची वेब सीरिज ट्रिपल एक्स अनसेन्सॉर्डच्या काही दृश्यांवरून हिंदुस्थानी भाऊने गोंधळ देखील घातला होता. त्यानंतर एकता कपूरने यासर्व प्रकरणावर माफी मागितली होती. आता स्वत: हिंदुस्थानी भाऊ दौलतगंज या वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे.
दौलतगंज या वेब सीरिजच्या शूटिंगला अयोध्येत सुरूवात झाली आहे. वेब सीरिजमध्ये हिंदुस्थानी भाऊ व्यतिरिक्त अभिनेता दक्ष अजित सिंह आणि एहसान खानसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन फिरोज खान करत आहे. यावर्षीच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बबलू उर्फ विकास जयराम पाठक हा जन्माने मुंबईकर आहे. तो आई-वडील, पत्नी आणि मुलगा आदित्य यांच्यासह मुंबईत राहतो. पुलवामा हल्ल्यानंतर भारताविषयी बोलणाऱ्यांना चपराक लगावण्यासाठी त्याने सहजच एक व्हिडीओ बनवला होता. या व्हिडीओला चांगले हिट्स मिळाले. विकासचे 'हिंदुस्थानी भाऊ' असे नामकरण झाले. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक सोशल मीडियावर आधीपासून प्रसिद्ध आहे पण तो जास्त लोकप्रिय बिग बॉस शोच्या तेराव्या सीझनमध्ये सहभागी झाल्यानंतर झाला. विकास पाठक हा 'हिंदुस्तानी भाऊ' या नावाने टिकटॉक, यूट्युब आणि फेसबुकवर लोकप्रिय आहे.
भाऊचे टिकटॉकवर ६ लाख, तर यूट्युबवर तब्बल १० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो नेहमी सोशल मीडियावर देश आणि जगभरातील घटनांवर वेगवेगळे व्हिडिओ बनवून त्यावर आपलं मत व्यक्त करत असतो.