'25 लाख रुपये हुंडा घेऊनही केली मारहाण'; राखी सावंतच्या नवऱ्यावर पहिल्या पत्नीचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 12:27 PM2021-12-12T12:27:54+5:302021-12-12T12:30:26+5:30
Bigg Boss 15: अलिकडेच या शोमध्ये रितेशचं पहिलं लग्न झाल्याचा खुलासा झाला. राखी सावंतसोबत लग्न करण्यापूर्वी रितेशचं पहिलं लग्न झालं असून त्याला एक लहान मुलगादेखील आहेत.
छोट्या पडद्यावरील बिग बॉस १५ चं (Bigg Boss 15) पर्व सध्या राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिचा पती रितेश (Ritesh) यांच्यामुळे चांगलंच गाजतंय. काही दिवसांपूर्वीच राखी आणि रितेशने या शोमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. तेव्हापासून ही जोडी टास्कपेक्षा त्यांच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच या शोमध्ये रितेशचं पहिलं लग्न झाल्याचा खुलासा झाला. राखी सावंतसोबत लग्न करण्यापूर्वी रितेशचं पहिलं लग्न झालं असून त्याला एक लहान मुलगादेखील आहेत. रितेशचं हे बिंग सर्वांसमक्ष फुटल्यानंतर आता त्याच्या पत्नीने रितेशवर गंभीर आरोप केले आहेत. एका मुलाखतीत तिने रितेशवर मारहाणी आणि हुंडा घेतल्याचे आरोप केले आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिजीत बिचुकले आणि राखी सावंत यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. या राखीने भाड्याने पती आणलाय, असा आरोप अभिजीने केला होता. तेव्हापासून रितेशच्या नावाची चर्चा रंगली होती. यामध्येच आता रितेशची नवीन पोलखोल झाली आहे.
रितेशच्या पहिल्या पत्नीचं नाव स्निग्धा प्रिया (snigdha priya) असं असून तिने अलिकडेच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने रितेशवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले आहेत.
रितेश आणि माझं लग्न २०१४ मध्ये झालं. लग्नानंतर एका वर्षांनी आम्हाला मुलगा झाला. रितेशचं कुटुंब दिल्लीत विद्याविहार येथे स्थायिक आहे. मात्र, तो मूळचा बिहारमधील पश्चिम चंपारण येथील आहे. त्यामुळे ज्यावेळी आमचं लग्न झालं तेव्हा बिहारच्या परंपरेनुसार, माझ्या कुटुंबाने रितेशला २५ लाख रुपयांचा हुंडा दिला होता, असं स्निग्धा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "रितेशने लग्नानंतर अनेकदा मला मारहाण केली. २०१७ मध्ये ज्यावेळी आम्ही चेन्नईमध्ये होतो. त्यावेळी एका कारणावरुन आमच्यात वाद झाले होते. त्यावेळी त्याने तब्बल ४ तास मला बेल्टने मारहाण केली होती. या घटनेनंतर आम्ही विभक्त झालो."
रितेशच्या बहिणीनेच आमचं लग्न जुळवलं होतं. रितेश अत्यंत डोक्याने चालणारा माणूस असून तो इतरांना त्याच्या बोलण्यात अडकवतो. इतकंच नाही तर रितेश निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तो केवळ श्रीमंत असल्याची खोटी बतावणी करतो. तो अत्यंत टिपिकल व्यक्ती असून तो अजूनही पत्नीला तिच्या मनाप्रमाणे कपडे घालण्याचंही स्वातंत्र्य देत नाही.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रितेश सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच त्याने बिग बॉसच्या घरात सर्वांसमोर राखीला किस केलं होतं. त्यामुळे रितेश सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. त्यातच त्याच्या पहिल्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे त्याच्यावर सर्व स्तरांमधून टीकाही होत आहे.