BB 15:पूर्वाश्रमीच्या पतीच्या नावाने रश्मी देसाईचा उडतो थरकाप, नंदीश संधूविषयी बोलताना ढसाढसा रडली अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 11:43 AM2021-12-31T11:43:13+5:302021-12-31T11:45:29+5:30
रश्मी देसाईला (Rashmi Desai) नंदिश संधूपासून (Nandish Sandhu) घटस्फोटाचे घेतल्याचे कारण विचारण्यात आले होते. मात्र, रश्मीने या प्रकरणावर बोलण्यास नकार देत मला याबाबत बोलायचे नसल्याचे सांगितले.
रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात. मात्र चंदेरी दुनियेतील काही सेलिब्रिटी याला अपवाद ठरतात. अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये आणखी एका अभिनेत्रीचे नाव घेतले जाते ती म्हणजे टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईचं (Rashmi Desai).रश्मी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
'बिग बॉस 15' (Bigg Boss 15 Latest Episode)च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये रश्मीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चा करताना दिसली. इतकेच नाही तर रश्मी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील हे दुःखद क्षण आठवून रडतानाही दिसली. रश्मीने आधी राखी आणि नंतर उमर रियाझच्या जवळ आपल्या मनातले दुःख व्यक्त केले. रश्मी म्हणाली की, आजही तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या नावाने तिचा थरकाप उडतो.या सगळ्या काळात आपण भेदरल्याचे तसंच खचून गेल्याचंही रश्मीने म्हटले होते.
घटस्फोटानंतर लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचाच जास्त विचार करते. कठीण समयी आणि आव्हानात्मक परिस्थितीत आईवडिल, कुटुंबीय आणि निकटवर्तीयांनी खंबीरपणे साथ दिल्याचे तिने सांगितले आहे. सगळ्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत केल्याबद्दल आईवडिलांची आणि जवळच्या लोकांची ऋणी आहे असंही तिने म्हटले आहे.
रश्मी देसाईला नंदिश संधूपासून (Nandish Sandhu)घटस्फोटाचे घेतल्याचे कारण विचारण्यात आले होते. मात्र, रश्मीने या प्रकरणावर बोलण्यास नकार देत मला याबाबत बोलायचे नसल्याचे सांगितले. रश्मी राखीला सांगते की त्याबद्दल बोलण्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या (नंदिश) जीवनावर परिणाम होऊ शकतो.
रश्मी देसाई पुढे म्हणाली की ते दोघेहे आता त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खुश आहेत. दोघांच्याही बाबतीत त्रासदायक गोष्टी घडू नयेत अशी तिची इच्छा आहे. रश्मी म्हणाली की तिच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकेल अशा कोणत्याही गोष्टीबद्दल बोलणे तिला योग्य वाटत नाही. "मला कोणालाही दुखवायचे नाही."